स्वस्तात म्हाडाच्या फ्लॅटसाठी ८९ लाख रुपये गमावले
सहाजणांना गंडा घालणार्या दुकलीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – स्वस्तातील म्हाडा फ्लॅटसाठी सहाजणांनी सुमारे ८९ लाख रुपये गमावल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. या सहाजणांना फ्लॅटच्या नावाने चुना लावणार्या विजय सूर्यकांत माने आणि ज्योती बाजीराव पाटील या दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
मारुती आप्पाजी चव्हाण हे विरार येथे राहत असून कांदिवलीतील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. २००७ ते २०१५ या कालावधीत ते बँकेच्या मालाड येथील शाखेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तिथेच त्यांची ओळख ज्योती पाटील या मालाड येथील मार्वे रोड, मालवणी चर्चजवळ राहणार्या एका महिलेशी झाली होती. या ओळखीदरम्यान तिने त्यांना तिची म्हाडामध्ये चांगली ओळख आहे. तिने आतापर्यंत अनेकांना म्हाडामध्ये स्वस्तात फ्लॅट मिळवून दिले आहेत असे सांगितले होते. तिने त्यांनाही म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट मिळत असल्याने त्यांनीही तिला मदत करण्याची विनंती केली हाती.
जून २०१५ तिने त्यांची ओळख मालवणीतील रहिवाशी असलेल्या विजय मानेशी करुन दिली होती. विजय याचेही म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्याच्याच मदतीने त्यांना फ्लॅट देणार असल्याचे सांगतले. यावेळी या दोघांनी त्यांना बोरिवली आणि कांदिवलीत म्हाडाचे अनेक फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगून २० लाखांमध्ये फ्लॅट देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना बोरिवलीतील शिंपोली, चिकूवाडीतील म्हाडाचे काही फ्लॅट दाखविले होते. त्यामुळे त्यांनी ती माहिती त्यांच्या जावयासह परिचित लोकांना सांगितली होती. तेदेखील म्हाडाचा फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे मारुती चव्हाण यांनी त्यांच्यासह त्यांच्या परिचित इतर पाचजणांसाठी म्हाडाच्या फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी या दोघांनी त्यांनाही फ्लॅट देण्याचे मान्य केले होते.
ऑगस्ट २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत त्यांच्याकडून या दोघांनी सुमारे ८९ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांना म्हाडा फ्लॅटचे ताबा पावती, विशेष सहाय्य विभाग, मुंबई झोपडीधारकाचे ओळखपत्र, शासनास रक्कम दिल्याची पावती आदी बोगस दस्तावेज दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फ्लॅटच्या नावाने या दोघांनी सहाणजांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विजय माने आणि ज्योती पाटील या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.