म्हाडा फ्लॅटच्या नावाने भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या अधिकार्याची फसवणुक
फ्लॅटसाठी घेतलेल्या २२ लाखांच्या अपहारप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या एका ३९ वर्षांच्या अधिकार्याला म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून सुमारे २२ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध समतानगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मनिष भरत पांचाळ, पुनम मनिष पांचाळ आणि बाळासाहेब शिवाजी पवार ऊर्फ दत्ता पवार अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार भारतीय सेनेतून निवृत्त झाले असून ते सध्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कामाला आहेत. कांदिवलीतील आकुर्ली रोडवर ते त्यांच्या कुटुुंबियांसोबत राहतात. निवृत्तीनंतर त्यांना ३७ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटमध्ये ही रक्कम गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्या शाळेतील एका मित्राने त्यांची ओळख दत्ता पवारशी करुन दिली होती. चौकशीदरम्यान त्यांना दत्ता हा एसआरए आणि म्हाडामध्ये प्रॉपटी एजंटचे काम करत असल्याचे समजले होते. त्याने त्यांना म्हाडामध्ये एक स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. याकामी त्याला त्याचा मित्र मनिष पांचाळ हा मदत करत असल्याचे सांगून त्यांना कांदिवलीतील महावीरनगर परिसरात असलेल्या म्हाडा इमारतीमध्ये सॅम्पल फ्लॅट दाखविला होता. फ्लॅट पाहण्यासाठी ते त्यांच्या पत्नीसोबत गेले होते. सॅम्पल फ्लॅट आवडल्याने त्यांनी त्याच इमारतीमध्ये फ्लॅट घेण्याचे नक्की केले होते. यावेळी त्यांनी फ्लॅटची किंमत ६५ लाख रुपये सांगितली होती. त्यामुळे त्यांनी ३७ लाख रुपये देऊन उर्वरित २८ लाख रुपयांचे गृहकर्ज घेण्याचे ठरविले होते.
यावेळी दत्ता आणि मनिषने शासकीय कोट्यातून फ्लॅट मिळत असल्याने त्यांना व्याजदर भरावे लागणार नाही असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करणयाचा प्रयत्न केला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना २७ लाख रुपये दिले होते. त्यापैकी २१ लाख दत्ता तर सहा लाख रुपये मनिषच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. जुलै २०२२ रोजी त्यांना वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात बोलाविण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आले होते. मात्र हा संपूर्ण व्यवहार त्यांना संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी या दोघांकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी म्हाडा लॉटरीमध्ये ज्या लोकांना फ्लॅट लागला आहे, परंतू कागदपत्रांसह पैशांच्या अभावामुळे काही फ्लॅट रद्द झाले आहेत. ते रद्द झालेले फ्लॅट त्यांच्या नावावर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी काही म्हाडा अधिकार्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे चौकशी केली होती. यावेळी या अधिकार्यांनी म्हाडा अशा प्रकारे कोणालाही रद्द झालेले फ्लॅट अलोट करत नाही. त्यामुळे तुमची संबंधित व्यक्तीकडून फसवणुक होत असल्याचे सांगून त्यांना सावघगिरीने व्यवहार करा असे सांगितले.
ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी हा व्यवहार रद्द करुन फ्लॅटसाठी दिलेल्या २७ लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी मनिषने त्यांना पाच लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित २२ लाखांचा अपहार करुन मनिष, पूनम आणि दत्ता यांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.