मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – भूखंडाचा व्यवहार रद्द झाल्यानंतर लोणावळा येथील बंगल्याचा ताबा देण्याचे आश्वासन देऊन भूखंडासह बंगल्यासाठी घेतलेल्या 2 कोटी 32 लाखांचा अपहार करुन एका विकासकाची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश कनुभाई शहा, सुकेतू भोगीलाल शहा, हर्षद कांतीलाल शाह, राहुल कांतीलाल शहा, मयुर कांतीलाल शहा आणि नितीन कांतीलाल शहा अशी या सहाजणांची नावे आहेत. या सर्वांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरारोडचे रहिवाशी असलेले तक्रारदार झेन नानालाल पालन हे व्यवसायाने विकासक आहेत. त्यांची सदगुरु बिल्ड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची बांधकाम क्षेत्राशी संबंधित एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीकडून मिरारोड, वाशी, विलेपार्ले परिसरात काही इमारतीचे बांधकाम सुरु आहेत. गेल्या अकरा वर्षांपासून ते कल्पेश शहासह इतर आरोपींच्या परिचित आहेत. त्यांचया मालकीचे बोरिवलीतील आयसी कॉलनीत एक भूखंड आहे. या जागेबाबत त्यांच्यात साडेसहा कोटी रुपयांमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला होता. मात्र काही कारणास्तव त्यांच्यातील व्यवहार पूर्ण झाला नव्हता. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या भावाना आर्थिक अडचण असल्याने झेन पालन यांनी सव्वादोन कोटी रुपये दिले होते. यावेळी त्यांनी त्यांना या भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते.
याबाबत झेन पालन आणि कल्पेश शहा यांच्यात एक करार झाला होता. या करारामध्ये इतर पाचही भावडांनी स्वाक्षरी केली होती. याच दरम्यान त्यांनी त्यांना आणखीन सात लाख रुपये दिले होते. मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांच्यातील व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. यावेळी त्यांनी त्यांना त्यांच्या मालकीचा लोणावळा येथील रेनबो मनोर सोसायटीचा बंगला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांनी त्यांना बंगल्याचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी भूखंड व्यवहारात दिलेल्या 2 कोटी 32 लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पेमेंट केले नाही.
गेल्या तीन वर्षांत ते सर्वजण त्यांना केवळ आश्वासन देत होते. मात्र बंगल्याचा ताबा किंवा त्यांचे पेमेंट परत करत नव्हते. कल्पेशसह इतर पाचजणांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एकाच कुटुंबातील सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सहाजणांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या भूखंडासह लोणावळा येथील बंगल्याचा शहा कुटुंबियांनी इतर कोणासोबत व्यवहार करुन त्याची फसवणुक केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.