मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – मेक माय ट्रिप आणि इजी माय ट्रिप या कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याची बतावणी करुन एका अज्ञात सायबर ठगाने बोरिवलीतील एका व्यावसायिकाची सुमारे चार लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच एमएचबी पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी तातडीने कारवाई ही रक्कम पुन्हा त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली. फसवणुकीची ही रक्कम पुन्हा मिळाल्याने या व्यावसायिकाने एमएचबी पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे आभार व्यक्त केले आहे.
बोरिवली परिसरात तक्रारदार राहत असून ते व्यावसायिक आहे. अलीकडेच त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने त्यांना तो मेक माय ट्रिप आणि इजी माय ट्रिप या साईटवरुन बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्याने सुमारे चार लाख रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झेंशन केले होते. चार लाख रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच व्यावसायिकाला फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तपासाला सुरुवात केली होती. तक्रारदार व्यावसायिकाची बँक खात्याची माहिती घेतलनंतर या पथकाने मेक माय ट्रिप साईडच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधला होता. त्यांना घडलेला प्रकार सांगून ती रक्कम फ्रिज करण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर या अधिकार्यांनी ती रक्कम संबंधित बँक खात्यात फ्रिज केली होती. फ्रिज केलेली ही रक्कम नंतर तक्रारदार व्यावसायिकाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. अशा प्रकारे तक्रार प्राप्त होताच सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तातडीने हालचाल करुन ही रक्कम परत मिळविण्यात मौलाची भूमिका बजाविली होती. त्यामुळे या पथकाने अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी कौतुक केले होते.