तेरा किलो सोने चोरी करुन पळून गेलेल्या त्रिकुटास अटक

गुन्हेगार पित्यानेच मुलासह मित्राच्या मदतीने चोरीचा कट रचला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 जून 2025
मुंबई,  – तेरा किलो सोने चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 72 तासांत पर्दाफश केला आहे. याप्रकरणी एका पिता-पूत्रासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 11 कोटी रुपयांचे तेरा किलो चोरीचे सोने जप्त केले आहेत. जिग्नेश नाथाभाई कुछडिया, यश जिवाभाई ओडेदरा आणि नाथाभाई हरदासभाई कुछडिया अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गुजरातच्या जुनागढ, मनकेवाडा व माणिकवाड्याचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुजरात येथे जे. पी. एक्सपोर्ट गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड नावाची कंपनी आहे. ही कंपनीत गुजरात दक्षिण भारतात सोने विक्री करते. कंपनीत अजय सुरेश घागडा हे सेल्समन म्हणून कामाला आहे. चार दिवसांपूर्वी कंपनीने अजय घागडा व त्याचा सहाय्यक जिग्नेश कुछडिया यांना काही सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. त्यानंतर ते दोघेही कंपनीच्या कामानिमित्त तामिळनाडू, आंधप्रदेश आणि कर्नाटक राज्यात दागिन्यांच्या विक्रीसाठी गेले होते. तिथे काही दागिन्यांची विक्री करुन ते तीन दिवसांपूर्वी बोरिवली येथे आले होते. बोरिवली येथे कंपनीचे एक फ्लॅट असून या फ्लॅटवर आराम करुन ते दुसर्‍या दिवशी गुजरातला जाणार होते. यावेळी संधी साधून जिग्नेशने सोन्याचे दागिने भरलेले दोन्ही बॅग घेऊन पलायन केले होते.

हा प्रकार नंतर अजय घागडा यांच्या लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या मालकाना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन एमएचबी पोलिसांनी जिग्नेश कुछडिया याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी तीन विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यात पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबूलाल शिंदे, गणेश तोरगल, गणेश तारगे, वैभव साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार साखरे, परीट, साळुंखे, देवकर, आहेर, शरमाळे, मस्के, मोरे, मंजुळे यांचा समावेश होता.

या पथकाने परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि मिळालेल्या तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी गुजरात येथे लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सर्व रेल्वे, रस्ता आणि विमानतळ मार्गावर पोलिसांनी विशेष नजर ठेवली होती. पिठाडिया टोलनाक्यावर मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजवरुन जिग्नेश हा त्याचे वडिल नाथाभाई व त्यांचा मित्र यश यांच्यासोबत एका महिंद्रा थार कारने गुजरातच्या जुनागढच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने त्यांचा पाठलाग करुन जिग्नेश आणि यश या दोघांना कारसहीत ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीनंतर त्याचे वडिल नाथाभाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासात त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाथाभाई याच्याविरुद्ध हत्येसह शरीराविरुद्ध, दारु विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याचा मुलगा जिग्नेश आणि यशच्या मदतीने हा चोरीची ही योजना बनविली होती. चौकशीनंतर त्यांच्याकडून पोलिसांनी 11 कोटी 1 लाख 71 हजार 027 रुपयांचे 1107.07 किलो वजनाचे सोने हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या तिघांनाही गुजरातच्या लोकल कोर्टात हजर करुन ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आणल्यांनतर त्यांना मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल होताच अवघ्या 72 तासांत एमएचबी पोलिसांनी या चोरीचा गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा बहुतांश सोने जप्त केले आहे. पोरबंदर, राजकोट, जामनगर, जुनागढ आदी परिसरात सतत पाळत ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page