बोरिवलीतील बँक अधिकार्याच्या घरी साडेदहा लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – बोरिवलीतील एका बँक अधिकार्याच्या घरी प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने सुमारे साडेदहा लाख रुपयांचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना 26 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत बोरिवलीतील एलआयसी कॉलनी, जीवन विमा नगर, वाईल्डनेस सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 6/12 मध्ये घडली. देवेंद्र खंडुभाई राघव हे 56 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील आकुर्ली रोड, कल्पतरुण टॉवरमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचा बोरिवलीतील वाईल्डनेस सोसायटीमध्ये अन्य एक फ्लॅट आहे. ते सध्या वांद्रे येथील बीकेसीच्या कतार नॅशनल बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ते सध्या कांदिवलीत राहत असले तरी अधूनमधून ते त्यांच्या बोरिवलीतील फ्लॅटमध्ये जात होते. याच फ्लॅटमधील कपाटात त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे काही सोन्याचे, हिरेजडीत दागिने ठेवले होते.
15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होते, त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबिय बोरिवलीतील फ्लॅटमध्ये आले होते. मतदान करुन ते सर्वजण त्यांच्या कांदिवलीतील घरी निघून गेले होते. यावेळी त्यांना कपाटातील सर्व दागिने सुरक्षित असल्याचे दिसून आले. मंगळवारी 27 जानेवारीला त्यांना त्यांच्या सोसायटीच्या 71 वर्षांच्या वयोवृद्ध रहिवाशी शुभांगी विनायक महाबल यांचा कॉल आला होता. त्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असून घरात चोरी झाल्याची शंका व्यक्त केली होती.
या माहितीनंतर ते त्यांच्या बोरिवलीतील फ्लॅटमध्ये आले होते. त्यांनी आत प्रवेश केला असता त्यांना कपाटातील सुमारे साडेदहा लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. फ्लॅटमध्ये कोणीही राहत नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सर्व हिरेजडीत सोन्याचे दागिने घेऊन या चोरट्याने पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी देवेंद्र राघव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.