सोळा वर्षांच्या मुलीशी कारमध्ये अश्लील चाळे करुन विनयभंग
बोरिवलीतील घटना; ५९ वर्षांच्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – ओटस जातीच्या कुत्र्यासोबत खेळण्यासाठी आलेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी तिच्याच परिचित व्यक्तीने कारमध्ये नेताना अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या कलमार्ंगत गुन्हा दाखल होताच सॅव्हिओ नावाच्या एका ५९ वर्षांच्या आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ही घटना शुक्रवारी १२ जुलैला सायंकाळी सात वाजता बोरिवलीतील एलआयसी कॉलनीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार मुलगी ही बोरिवली परिसरात राहत असून सध्या ती शिक्षण घेते. आरोपीकडे ओटस जातीचा एक कुत्रा असून ती त्याच्यासोबत नेहमी खेळते. शुक्रवारी सायंकाळी ती कुत्र्यासोबत खेळत होती. यावेळी तिथे तिच्या परिचित आरोपी आला. त्याने तिला कारमधून फिरायला जाऊया असे सांगून कारमध्ये बसविले. एलआयसी कॉलनीजवळ येताच त्याने तिच्यासोबत कारमध्येच लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी अश्लील संभाषण करुन छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. काही वेळानंतर त्याने तिला तिच्या इमारतीजवळ सोडले. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी एमएचबी पोलिसांत धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सॅव्हिओविरुद्ध ७४, ७५ (१), ७५ (२) भारतीय न्याय संहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी सॅव्हिओला पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार मुलगी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत होते. आरोपीकडे एक कुत्र्याचे पिल्लू असल्याने ती त्याच्याकडे कुत्र्यासोबत खेळण्यासाठी येत होती. काही महिन्यांपूर्वी आरोपी बाजूच्या इमरतीमध्ये राहण्यासाठी गेला होता. त्यामुळे ती त्यांच्याकडे नियमित जात होती. शुक्रवारी पाऊस असल्याने तो तिला घरी सोडण्यासाठी कारमधून जात होता, त्यावेळेस हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.