प्रेयसीच्या हत्येनंतर पळून गेलेल्या प्रियकराला अटक
अटकेच्या भीतीने हत्येनंतर हैद्राबादला पळून गेला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणानंतर चुनियादेवी रामविश्वास यादव या ३२ वर्षांच्या महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या करुन पलायन केले. अटकेच्या भीतीने हैद्राबादला पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला अवघ्या २४ तासांत एमएचबी पोलिसांनी अटक करुन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आले. राजीवकुमार गणोर साह असे या २३ वर्षांच्या आरोपी प्रियकराचे नाव असून अटकेनंतर त्याला सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवधेशकुमार फुलुराम यादव हा बिगारी कामगार असून तो बोरिवलीतील न्यू लिंक रोड गणपत पाटील नगरातील गल्ली क्रमांक चारमध्ये राहतो. तो मूळचा बिहारचा रहिवाशी असून मृत चुनियादेवी ही त्याची मोठी बहिण आहे. ती विवाहीत असून तिच्या मुलीसोबत याच परिसरात राहते. तिचे तिच्या पतीसोबत पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या एक वर्षांपासून ती तिच्या सहा वर्षांया मुलीसोबत तिथे राहत होती. याच परिसरात राहणार्या राजीवकुमारसोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. त्यातच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. ३१ जुलैला त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवधेशकुमार यादव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजीवकुमार साहविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो मुंबईतून पळून गेला होता. या घटनेची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद जायभाये यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, किरण सुरसे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, पोलीस हवालदार प्रविण जोपळे, संदीप परीट, सतीश देवकर, अर्जुन अहिर, गणेश शेरमाळे, आदित्य राणे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना हत्येनंतर राजीवकुमार हा हैद्राबादला पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर या पथकाने हैद्राबादच्या कोमपल्लीच्या एका मोठ्या इंडस्ट्रियलमध्ये कामाला लागलेल्या राजीवकुमार साह याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच चुनियादेवीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्याला हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.