पिता-पूत्राच्या हत्येतील वॉण्टेड आरोपीस अटक व कोठडी
पूर्ववैमस्नातून झालेल्या तिहेरी हत्येप्रकणी दोन गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – बोरिवलीतील गणपत पाटील नगरात पूर्ववैमस्नातून रामनवल गुप्ता आणि अरविंद रामनवल गुप्ता या पिता-पूत्राची हत्या केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस अखेर गुरुवारी एमएचबी पोलिसांनी अटक केली. अरमान अमीत शेख असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत दोन स्वतंत्र हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून यातील पहिल्या गुन्ह्यांत अमर रामनवल गुप्ता याला पोलिसांनी अटक केली होती. आता दुसर्या गुन्ह्यांत अरमान शेख याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याचा भाऊ हसन अमीत शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
बोरिवलीतील गणपत पाटील नगरात राहणार्या गुप्ता आणि शेख कुटुंबियांमध्ये जुना वाद सुरु होता. याच वादातून रविवारी 18 मेला सायंकाळी या दोन्ही गटातील तुफान राडा झाला होता. दोन्ही गटाकडून एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. लाथ्याबुक्यासह तिक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात दोन्ही कुटुंबातील सातजण गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी झालेल्या या सर्वांना नंतर जवळच्या लोटस आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे रामनवल गुप्ता, अरविंद रामनवल गुप्ता आणि हमीद नसीरुद्दीन शेख या तिघांना मृत घोषित करण्यात आले तर अमर रामनवल गुप्ता, अमीत रामनवल गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख यांच्यावर उपचार सुरु होते. त्यापैकी अमरला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते.
याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येसह हत्येचा प्रयत्न, दंगल घडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. याच गुन्ह्यांत सोमवारी अमर गुप्तासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर अमरला पोलीस केाठडी तर अल्पवयन मुलाची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. गुरुवारी गुप्ता पिता-पूत्रांच्या हत्येप्रकरणी अरमान शेख याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा भाऊ हमीद याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.