मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – तीन दिवसांपासून क्षुल्लक कौटुंबिक वादातून होणार्या वादाला कंटाळून एका 27 वर्षींय महिलेची तिच्याच पतीने ग्रेनाईट कटसह गळा आवळून हत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. या हत्येनंतर आरोपी पतीने एमएचबी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करुन हत्येची ही माहिती दिली होती. रेश्मा पप्पू राठोड असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा पती पप्पू मानू राठोड याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपती पाटील नगर झोपडपट्टीत घडली. याच ठिकाणी पप्पू राठोड हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून तो बिगारी कामगार आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे त्याची पत्नी रेश्मासोबत कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यात पुन्हा क्षुल्लक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात पप्पूने रेश्माच्या डोक्यात ग्रेनाईट कटरने हल्ला केला होता. त्यानंतर त्याने तिची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली होती.
या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे तो घरातून निघाला आणि थेट एमएचबी पोलीस ठाण्यात आला. तिथे उपस्थित पोलिसांना त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या रेश्माला पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पती पप्पू राठोड याला पोलिसांनी अटक केली.