मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – जुन्या वादातून असद रफिक मलिक या २० वर्षांच्या तरुणावर दोन बंधूंनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका भावाला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धांत तिमय ठाणेकर असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा भाऊ वेदांत तिमय ठाणेकर याचा पोलीस शोध ेघत आहेत. सिद्धांत हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
रफिक मंजुर मलिक हा दहिसर येथे राहत असून त्याचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्याचा असद हा मुलगा आहे. मंगळवारी १४ जानेवारी सायंकाळी सात वाजता असद हा त्याचा मित्र अकबर सोबत दहिसर येथील पानशॉपसमोर गप्पा मारत होते. यावेळी तिथेच काही तरुण जोरजोरात आरडाओरड करत होते. त्यामुळे असद आणि अकबर तिथे गेले. त्यांनी त्यांना आरडाओरड करु नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने ठाणेकर बंधूंनी तु जास्त पटेलीगिरी करु नकोस. मागच्या वेळेस तुझ्या मामाने त्यांच्याशी भांडण केले होते. आता तू भाईगिरी करतोस का असे सांगून असदला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर वेदांतने त्याच्याकडील चाकूने त्याच्यावर वार केले होते. पोटात वार केल्याने असद हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या पोटात चाकू अडकला होता. लोकांची गर्दी जमू लागताच ते दोघेही पळून गेले होते. ही माहिती समजताच रफिक मलिक हे तिथे गेले आणि जखमी झालेला त्यांचा मुलगा असदला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे.
जुन्या वादातून झालेल्या भांडणातून ठाणेकर बंधूंनी पुन्हा वाद काढून असदवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रफिक मलिक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही ठाणेकर बंधूंविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असताना सिद्धांतला पोलिसांनी अटक केली तर वेदांतचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर सिद्धांतला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.