प्रेमसंबंध तोडले म्हणून प्रेयसीला प्रियकराकडून धमकी
अश्लील फोटो व्हायरलची धमकी देणार्या प्रियकराला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – प्रेमसंबंध तोडले म्हणून एका 21 वर्षांच्या तरुणीला तिच्याच प्रियकराने धमकी दिल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयासह इतरांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितेश अरुण झा या 22 वर्षांच्या आरोपी प्रियकराला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्याच्याकडून त्याचे दोन्ही मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
21 वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या कुटुुंबियांसोबत बोरिवलीतील लिंक रोड, गणपत पाटील नगरात राहते. याच परिसरात नितेश झा हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. पूर्वी त्यांच्यात चांगली मैत्री होती, या मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र नंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु झाला आणि तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. रविवारी 20 जुलैला रात्री साडेदहा वाजता ही तरुणी आयसी कॉलनीतील एका कपड्याच्या दुकानातून ओढणी घेण्यासाठी जात होती. यावेळी तिथे नितेश आला आणि त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती त्याला भेटत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याच्या संपर्कात राहत नसल्याच्या कारणावरुन तिच्याशी वाद घालू लागला.
मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्याने तिला त्याचा मोबाईल क्रमांक अनब्लॉक कर, त्याच्याशी बोल नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा राग आल्याने त्याने तिचे नकळत काढलेले काही अश्लील फोटो तिच्या व्हॉटअपवर पाठविले होते. ते फोटो सोशल मिडीयासह इतरांना व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ते फोटो पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. या घटनेनंतर तिने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तेजस झा याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तेजसविरुद्ध पोलिसांनी 126 (2), 77, 78, 79, 351 (2), 351 (4) भारतीय न्याय सहिता 66 (ई), 67, 67 (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तेजसला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचे दोन्ही मोबाईल जप्त केले आहे. ते मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.