बहिणीसह मैत्रिणीशी चॅट करणार्‍या कॉलेज मुलांवर हल्ला

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – बहिणीसह तिच्या मैत्रिणीशी मैत्री करुन त्यांच्याशी चॅट करतो म्हणून सतरा वर्षांच्या दोन कॉलेज तरुणांवर चारजणांच्या एका टोळीने बांबूसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही तासांत चारही आरोपींना दहिसर येथून अटक केली. अरकान मोहम्मद जमा खान, अरमान अब्दुल अजीज खान, हरमीन दिनानाथ यादव आणि समीर अब्दुल मनी शहा अशी या चौघांची नावे असून ते चौघेही दहिसर कांदरपाडा, एमएचबी कॉलनीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा कांदिवलीतील पोईसर परिसरात राहत असून सध्या तो बोरिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये फर्स्ट इअरमध्ये शिकतो. त्याचा एक मित्र असून ते दोघेही दोन तरुणींच्या संपर्कात होते. ते सर्वजण एकाच वर्गात शिकत असल्याने काही दिवसांत त्यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर ते दोघेही दोन्ही तरुणींच्या मोबाईलसह व्हॉटअपच्या माध्यमातून संपर्कात होते. नेहमी चॅटींग करत होते. या दोघींना भेटण्यासाठी कांदरपाडा परिसरात जात असल्याने तिथेच त्यांची हरमीन, समीर, अरमान, अरकानसह इतर मुलांशी चांगली ओळख झाली होती.

27 ऑगस्टला सायंकाळी साडेसात वाजता ते चोघेही त्यांच्या कॉलेजजवळ भेटले होते. यावेळी तिथे एका तरुणीचा भाऊ आणि दुसर्‍या तरुणीचा मित्र आले. त्यांनी त्यांच्याशी दोन्ही तरुणीबाबत चर्चा करायची आहे असे सांगून त्यांना बोरिवलीतील गोपीनाथ मुंडे गार्डनजवळ आणले. तिथेच त्यांचे इतर दोन सहकारी होते. यावेळी त्यांनी तक्रारदार मुलासह त्याच्या मित्राला दोन्ही तरुणींसोबत चॅट करतात म्हणून शिवीगाळ करुन बांबूसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. अचानक झालेल्या हल्ल्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. या दोघांनाही पुन्हा परिसरात दिसलात जिवे मारण्याची धमकी देऊन ते चौघेही तेथून पळून गेले.

जखमी झालेल्या या दोघांवर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार एमएचबी पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही तरुणांविरुद्ध भारतीय न्याय सहिताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरकान खान, अरमान खान, हरमीन यादव आणि समीर शहा या चौघांनाही दहिसर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page