मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – बिटकॉईनच्या माध्यमातून एका महिलेची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केली, मात्र ऑनलाईन फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच एमएबी पोलिसांनी फसवणुकीची रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम तक्रारदार महिलेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली. फसवणुकीची रक्कम परत मिळाल्याने या महिलेने एमएचबी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
५२ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवलीतील वजीरानाका, ओल्ड अशोकनगर परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिला फेसबुकवर बिटकॉईनची एक जाहिरात दिसली होती. ऑनलाईन बिटकॉईन खरेदी केल्यास तिला चांगला आर्थिक फायदा होईल असे सांगून अज्ञात व्यक्तीने तिला बिटकॉईन खरेदीसाठी प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही बिटकॉईनसाठी काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. मात्र तिला कुठलाही परतावा न देता संबंधित व्यक्तीने तिची आर्थिक फसवणुक केली हेती. त्यामुळे तिने सायबर पोर्टलसह एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत एमएचबी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तपास सुरु केला होता. तक्रारदार महिलेचे बँक स्टेटमेंट काढून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली. त्या बँकेशी मेलवरुन संपर्क साधून संबंधित नोडल अधिकार्यांना संबंधित खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर बँकेच्या नोडल अधिकार्यांनी या बँक खात्यात जमा झालेली १ लाख २७ हजार ९६३ रुपयांची कॅश गोठवली होती. ही रक्कम नंतर तक्रारदार महिलेच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम परत मिळाल्याने या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले आहे.