मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – वयाच्या २४ वर्षांत ४० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. निलेश राजू लोंढे असे या आरोपीचे नाव असून तो कुर्ला येथील रहिवाशी आहे. अलीकडेच त्याने बोरिवलीतील एका फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे चार लाखांची घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून घरफोडीच्या इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यतेश दिनेश पारेख हे बोरिवलीतील योगीनगर, योगी दर्शन अपार्टमेंटमध्ये राहतात. २७ ऑक्टोंबरला त्यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने, कॅश आणि इतर वस्तू असा ४ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी निदर्शनास येताच यतेश पारेख यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यांच्या सोसायटीमध्ये रात्री नऊ वाजता दोन संशयित तरुण येताना दिसले. काही वेळानंतर ते दोघेही सोसायटीच्या बाहेर जाताना दिसून आले. याच दोघांनी ही घरफोडीची केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील आणखीन ५० ते ६० सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात ते दोघेही बोरिवलीहून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन अंधेरीपर्यंत जाताना दिसले. मात्र तेथून ते दोघेही कुठे गेले याचा उलघडा होऊ शकला नाही.
या फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यातील एक रेकॉर्डवरील घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपी निलेश लोंढे असल्याचे उघडकीस आले होते. तो चुन्नाभट्टी परिसरात राहत होता. त्यामुळे तिथे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक विजय आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, रविंद्र पाटील, महांतेश सवळी, योगेश मोरे यांनी तीन ते चार दिवस साध्या वेषात पाळत ठेवली होती. मात्र तो त्याच्या घरी आला नाही. तो कळवा येथील रेतीबंदर परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने निलेशला कळवा येथून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच त्याच्या मित्राच्या मदतीने यतेश पारेख यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निलेश हा कुर्ला येथील चुन्नाभट्टी, शंकर मंदिरासमोरील आझा गल्लीत राहतो. सध्या तो २४ वर्षांचा आहे. मात्र तो घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा त्याच्या सहकार्यासोबत घरफोडी करत होता. दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस ही टोळी फ्लॅटमध्ये प्रवेश करुन घरफोडी करत होती. निलेशकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.