पतीच्या आत्महत्येनंतर अकरा महिन्यानंतर पत्नीविरुद्ध गुन्हा
मानसिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून चेतन जगदीश मुसळे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अकरा महिन्यांनतर त्याच्या पत्नीविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौरी ऊर्फ आयुषी चेतन मुसळे असे या आरोपी पत्नीचे नाव असून तिच्यावर पती चेतनचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. चेतनच्या डायरीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच गौरीची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे.
बोरिवली परिसरात रेखा जगदीश मुसळे (६९) ही वयोवृद्ध महिला राहत असून ती शासकीय सेवेतून निवृत्ती झाली होती. चेतन हा तिचा मुलगा असून त्याच्याच नावावर तिचे राहते घर आहे. २००७ साली चेतनचे भाईंदरची रहिवाशी असलेल्या गौरीसोबत लग्न झाले होते. त्यांना चौदा वर्षांचा वेद नावाचा एक मुलगा आहे. त्याच्या लग्नानंतर रेखा या त्यांच्या गावी जास्त राहत होत्या. अधूनमधून त्या बोरिवली येथे येत होत्या. याच दरम्यान तिला चेतन आणि गौरी यांच्यात कौटुंबिक वाद सुरु असल्याचे समजले होते. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सतत खटके उडत होते. सततच्या वादाला कंटाळून डिसेंबर २०२० रोजी गौरी ही तिच्या मुलासोबत तिच्या माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून चेतन हा मानसिक तणावात होता. पत्नी आणि मुलगा पुन्हा घरी यावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. त्यातून नैराश्यातून २९ ऑगस्ट २०२३ रोजी त्याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्याच्या खिशात पोलिसांना एक सुसायट नोट सापडली होती. त्यात त्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी रेखा मुसळे यांचीही पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. मात्र मुलाच्या आत्महत्येमुळे ती दुखात होती. त्यामुळे तिने त्याच्या आत्महत्येबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता किंवा तक्रार केली नव्हती. अलीकडेच तिला चेतनची एक डायरी साापडली होती. त्यात त्याने त्याच्या पत्नी गौरी ऊर्फ आयुषीविषयी लिहिले होते. तिच्याकडून त्याचा मानसिक शोषण सुरु होता. त्यामुळे त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येला गौरी ऊर्फ आयुषी हीच जबाबदार असल्याचे डायरीमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने हा प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरीविरुद्ध पतीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.