पावणेसात कोटीच्या हिरेजडीत दागिन्यांच्या चोरीचा पर्दाफाश

राजस्थानच्या जंगलात ड्रोनच्या सहाय्याने चार आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – सुमारे पावणेसात कोटीच्या विविध विविध हिरेजडीत सोन्याचे दागिन्यासह चांदीच्या विटासह दागिने असा मुद्देमालाचा चोरीचा पर्दाफाश करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी मुख्य दोन्ही आरोपीसह चौघांना अटक केली. चोरीनंतर सर्व आरोपी राजस्थानच्या एक घनदाट जंगलात लपले होते, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन करुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तसेच ड्रोनच्या सहाय्याने आरोपींना शिताफीने अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभूसिंग गोपसिंग दसाणा, मोडसिंग चुनासिंग दसाना, गणपतसिंग मोहन चंदाना आणि किशनसिंग वग्गालाल रेबारी अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण राजस्थानच्या राजमसंदचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी साडेचार कोटीचे तीन किलो हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि पंधरा लाख रुपयांचे पाच किलो चांदीचे दागिने असा 4 कोटी 65 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर गणपतसिंग आणि किशनसिंग या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चोरीचा उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत देवीसिंग गोपसिंग दसाना याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना जानेवारी महिन्यांत बोरिवलीतील आयसी कॉलनी, होली क्रॉस रोड, रोझमार इमारतीमधील माय गोल्ड पॉईट या ज्वेलर्स शॉपमध्ये घडली. राकेश शांतीलाल पोरवाल हे ज्वेलर्स व्यापारी असून ते बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहतात. त्यांचा सोने, चांदी आणि हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहेत. त्यांच्या मालकीचे बोरिवली येथे माय गोल्ड पॉईट नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये प्रभू सिंग आणि नारायण सिंग हे दोघेही सेल्समन म्हणून काम करत होते. ते दोघेही राजस्थानच्या राजसंबंध, कवारिया गावचे रहिवाशी होते. शॉपमध्ये दिवसभरात विक्रीसाठी ठेवलेले विविध सोन्याचे दागिने दुकान बंद करण्यापूर्वी शॉपमधील छोटेखानी रुम असलेल्या दोन लोखंडी तिजोरीत ठेवले जाते.

ती जबाबदारी राकेश पोरवाल यांनी प्रभू आणि नारायण यांच्यावर सोपविली होती. शॉपमध्ये दिवसभर काम केल्यानंतर ते दोघेही बोरिवलीतील सागर लॉजमध्ये जेवण आणून रात्री उशिरा शॉपमध्येच झोपत होते. मंगळवारी रात्री उशिरा एक ग्राहक शॉपमध्ये आल्याने त्यांना दागिने ठेवण्यास उशीर झाला होता. त्यामुळे त्यांनी या दोघांना देऊन दागिने ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर ते त्यांच्या घरी निघून गेले होते. दुसर्‍या दिवशी राकेश पोरवाल हे त्यांच्या डहाणू येथील एका मित्राकडे वैयक्तिक कामासाठी गेले होते. दुपारी त्यांना त्यांच्या ग्राहक महिलेचा फोन आला होता. तिला तिच्या सोन्याच्या दागिन्याचे व्हॅल्यूऐशन करायचे होते. मात्र शॉप बंद असल्याने तिने त्यांना फोनवरुन माहिती दिली. शॉपच्या ग्रीलला बाहेरुन कुलूप लावला होता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी प्रभू आणि नारायण या दोघांना कॉल केला, मात्र त्यांनी त्यांचे कॉल घेतले नाही. त्यांचा मोबाईल नंतर बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते डहाणू येथून बोरिवली येथे आले होते. यावेळी त्यांना त्यांचे ज्वेलरी शॉप बंद असल्याचे तसेच बाहेरच असलेल्या लोखंडी गेटमध्ये चावी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शॉप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश करुन पाहणी केली होती. यावेळी त्यांना शॉपमध्ये कोणीही नव्हते, तिजोरीचे दरवाजे उघडे दिसले. तिजोरीतील 6 कोटी 79 लाख 85 हजार रुपयांचे विविध सोन्याचे, हिर्‍यांचे आणि चांदीच्या विटा असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा मुद्देमाल चोरी करुन प्रभू आणि नारायण सिंग हे दोघेही पळून गेले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमएचबी पोलिसांना ही माहिती दिली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. राकेश पोरवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रभू सिंग आणि नारायण सिंग या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही रात्री उशिरा तिजोरीचे सर्व दागिने चोरी करुन पळून गेले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी, पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, मगेश किरपेकर, संतोष भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी खरात, पोलीस हवालदार बबलू साळुंखे, संदीप परीट, तिरुपती रेकुळवाड, सतीश देवकर, अर्जुन आहेर, पोलीस शिपाई गणेश शेरमाळे, सचिन मंजुळे, सिद्धेश पाटील, योगेश मोरे, सुनिल मस्के, आदित्य राणे यांनी तपास सुरु केला होता.

प्रभू आणि नारायण हे दोघेही राजस्थानचे रहिवाशी होते. त्यामुळे ते राजस्थानला पळून जाण्याची शक्यता होती, त्यामुळे एक टिम राजस्थानला पाठविण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक माहितीवरुन 28 जानेवारीला प्रभूसिंगला कुवारिया गावच्या घनदाट जंगलातून ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यांत गणपतसिंग चंदाणा, किशनसिंग रेबारी, मोडसिंग दसाना आणि देवीसिंग दसाणा यांचा सहभाग उघडकीस आला होता. ते आरोपीही जंगलात लपल्याची माहिती प्रापत होताच पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई करुन मोडसिंग दसानाला ताब्यात घेतले. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी स्थानिक पोलिसांसह ड्रोनची मदत घेतली होती. या दोघांच्या अटकेनंतर तिन्ही आरोपी पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना अलीकडेच गणततसिंग आणि किशनसिंग या दोघांनाही कुवारिया गावातून पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पुढील कारवाईसाठी मुुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या चारही आरोपींकडून पोलिसांनी 4 कोटी 65 लाखांचा हिरेजडीत सोन्याचे, चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. देवीसिंग हा आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page