महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी बँकेची फसवणुक
पर्सनल लोन घेऊन पळून गेलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – मुंबई महानगपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन एका बँकेकडून घेतलेल्या सुमारे 62 लाखांचा पर्सनल लोनचा अपहार करुन चौघांनी पलायन केल्याची धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. पळून गेलेल्या चारही आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पर्सलन लोनचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रफुलता गंगाधर चव्हाण, नरेश राम सिंग, अतुल जितेंद्र तिवारी आणि क्रिष्णा श्यामनारायण तिवारी अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
देवेंद्र श्रीनाथ नायक हे ठाण्यातील मानपाडा परिसरात राहत असून एका खाजगी बँकेत पर्सनल लोन रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे पर्सनल लोनसाठी अर्ज येत असल्याने त्याची शहानिशा करुन संबंधित खातेदारांचे अर्ज पुढील कारवाईसाठी ते वरिष्ठांना सादर करतात. जून 2023 रोजी त्यांच्या बँकेत प्रफुलता चव्हाण या महिलेसह नरेश सिंग, अतुल तिवारी आणि क्रिष्णा तिवारी या चौघांनी पर्सनल लोनसाठी अर्ज केला होता. या चौघांनी ते महानगरपालिकेत कामाला असल्याचे सांगितले. अर्जासोबत त्यांनी त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड, राहण्याचा पत्ता, तीन महिन्यांचे सॅलरी स्लीप तसेच तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट आदी दस्तावेज सादर केले होते.
या दस्तावेजासह त्यांच्या राहत्या घरी जाऊन शहानिशा केल्यानंतर प्रफुलताला 25 लाख, नरेशला अकरा लाख, अतुलला पाच लाख आणि क्रिष्णाला पंधरा लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजूर झाले होते. लोनची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. काही महिने या चौघांनी कर्जाचे नियमित हप्ते भरले होते, मात्र नंतर त्यांनी हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे बँकेच्या वतीने त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यांच्या राहत्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली. यावेळी ते चौघेही संबंधित ठिकाणी राहत नसल्याचे उघडकीस आले. अर्जासोबत त्यांनी दिलेले मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ते मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्याविषयी चौकशी करण्यात आली होती.
यावेळी प्रफुलता चव्हाण, नरेश सिंग, अतुल तिवारी आणि क्रिष्णा तिवारी नावाचे कोणीही तिथे कामाला नसल्याचे उघडकीस आले. या चौघांनी ते महानगरपालिकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करुन बँकेतून पर्सनल लोन घेऊन लोनचे हप्ते न भरता बँकेची 62 लाख 81 हजार 531 रुपयाची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवेंद्र नायक यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रफुलता चव्हाण, नरेश सिंग, अतुल तिवारी आणि क्रिष्णा तिवारी या चौघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन लोनच्या पैशांच्या अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींचा शोध सुरु आहे. या चौघांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.