सहा कोटी साठ लाखांचे पेमेंट न देता कंपनीची आर्थिक फसवणुक
अंधेरीतील घटना; खाजगी कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जून २०२४
मुंबई, – विविध फॅब्रिक कपड्याची डिलीव्हरी केल्यांनतर सहा कोटी साठ लाखांचे पेमेंट न देता एका खाजगी कंपनीची आर्थिक फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. संदीप गुप्ता आणि अनुराग अग्रवाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही श्याम इंडोफेब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जस्टीन जेकब मॅथ्यू हे मूळचे हरियाणा येथील फरीदाबाद, सेक्टर ४२ ग्रीन फिल्म कॉलनीतील रहिवाशी आहेत. ते सध्या ग्रोयो कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. या कंपनीचे अंधेरीतील बोनाझा प्लाझामध्ये एक कार्यालय आहे. संदीप गुप्ता आणि अनुराग अग्रवाल हे नागपूरच्या नांदगाव पेठ, एमआयडीसी परिसरात असलेल्या श्याम इंडोफेब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत संचालक आहेत. त्यांच्या कंपनीसोबत त्यांचे फ्रॅबिक कपड्याबाबत खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. जुलै २०२२ ते २० जून २०२४ या कालावधीत या दोघांनी त्यांच्या कंपनीकडून सुमारे सोळा कोटी रुपयांचे वेगवेगळ्या फॅब्रिक कपड्याचा माल घेतला होता. त्यापैकी १० कोटी ३५ लाख रुपये कंपनीला दिले होते. मात्र उर्वरित सहा कोटी साठ लाख रुपयांचे पेमेंट करत नव्हते. याबाबत कंपनीने वारंवार संपर्क साधून, मेल पाठवूनही त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. ते दोघेही वेगवेगळे कारण सांगून कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी फॅब्रिक कपडे घेऊन पेमेंट न करता कंपनीची सहा कोटी साठ लाखांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने जस्टीन मॅथ्यू यांनी एमआयडीसी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी श्याम इंडोफेब प्रायव्हेट लिमिटेडचे दोन्ही संचालक संदीप गुप्ता आणि अनुराग अग्रवाल यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या दोन्ही संचालकांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सीआरपीसी ४१ (अ), (१) अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.