वीस टक्के कमिशनचे गाजर दाखवून व्यावसायिकाची फसवणुक
तीन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – पंधरा दिवसांत गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर वीस टक्के कमिशनचे गाजर दाखवून तेलंगणाच्या एका केमिकल व्यावसायिकाची त्याच्याच मित्राने सुमारे तीन कोटींना गंडा घातल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमाकांत पिलानी या आरोपी मित्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रमाकांतने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांना गुंतवणुकीची योजना सांगून त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
५७ वर्षाचे रवी पांडुरंगनायडू गंगापल्ली हे मूळचे तेलंगणाचे रहिवाशी आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत असून त्यांचा बेसिक केमिकल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी असून याच व्यवसायात त्यांना त्यांचा मुलगा मदत करतो. याच व्यवसायानिमित्त त्यांची रमाकांत पिलानीशी ओळख झाली होती. रमाकांत हा अग्रवाल बल्कऍक्टिव्ह प्रायव्हेट लिमिटेड आणि जीबीएल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सीईओ म्हणून काम करत होते. गेल्या सात वर्षांपासून एकमेकांच्या परिचित असल्याने त्यांच्यात अनेकदा आर्थिक व्यवहार होत होते. रमाकांतला त्यांनी गरज पडल्यास पैशांची मदत केली होती. काही दिवसांनी ते पैसे किंवा केमिकल माल पाठवून पैशांची परतफेड करत होते.
काही महिन्यांपूर्वी ते मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी रमाकांतशी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्याने त्यांना एका केमिकल कंपनीची गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. या केमिकल कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच संदर्भात त्यांची कोहीनूर कॉन्टीनेन्टल हॉटेलमध्ये एक मिटींग झाली होती. २०२२ साली त्यांनी त्यांच्याकडून व्यावसायिक कामासाठी एक कोटी आणि नंतर पाच कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना तीन कोटी रुपये परत केले आणि उर्वरित केमिकल माल पाठवून दिला होता. त्यात त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना कंपनीत पाच कोटी रुपये गुंतवणुक केल्यास वीस टक्के मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याकडे पाच कोटी रुपये नसल्याने त्यांनी रमाकांतच्या सांगण्यावरुन तीन कोटीची गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती.
ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला तीन कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. तीन कोटी आणि वीस टक्के कमिशन म्हणून त्यांना साठ लाख रुपये देण्याचे रमाकांतने मान्य केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम दिली नाही. आज-उद्या करुन रमाकांत त्यांना सतत टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने रमाकांतने दिलेला तीन कोटीचा धनादेश बँकेत टाकला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. तीन कोटीच्या गुंतवणुकीवर पंधरा दिवसांत वीस टक्के कमिशन म्हणून साठ लाख रुपये देतो असे सांगून रमाकांतने त्यांची आर्थिक फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रमाकांत पिलानीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच रमाकांतची पोलिसाकडून चौकशी होणार आहे.