व्याजदराचे गाजर दाखवून गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक
सव्वाकोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगल्या व्याजदाराचे गाजर दाखवून एकाच कुटुंबातील तिघांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रोहन शिंदे, हेमाली शिंदे अणि सुदीप शिंदे अशी या तिघांची नावे असून या तिघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जया शंकरप्रसाद वेमुला ही ६३ वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरी परिसरात राहत असून ती सध्या निवृत्त झाली आहे. चार वर्षांपूर्वी तिची शिंदे कुटुंबियांशी ओळख झाली होती. या तिघांनी जयासह तिचा मुलगा आणि सूनेला मार्केट मंत्रा ९९ ऍड कन्सलन्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत गुंतवणुकीची ऑफर देताना या गुंतवणुकीवर प्रति महिना अडीच टक्का व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. तसेच त्यांची कंपनीत महाराष्ट्रात जवळपास शंभर शाखा तयार करणार आहे. त्यात जास्तीत जास्त गुंतवणुक केल्यास आणखीन व्याजदराचे गाजर दाखविले होते. या तिघांवर विश्वास ठेवून जया वेमुलासह तिच्या मुलगा आणि सूनेने त्यांच्या कंपनीत सुमारे सव्वाकोटीची गुंतवणुक केली होती. या तिघांनी कंपनीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर न करता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना फेब्रुवारी २०२४ पर्यंत नियमित व्याजदराची रक्कम दिली, मात्र नंतर त्यांनी त्यांना कुठलाही मोबदला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र शिंदे कुटुंबियांनी मूळ रक्कम न देता या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोहन शिंदे, हेमाली शिंदे आणि सुदीप शिंदे या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे कायदेशीर समन्स बजाविले जाणार आहे.