क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करुन खाजगी कंपनीच्या 1.18 कोटीचा अपहार
चीफ फायनाशियल अधिकार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – कार्यालयीन कामासाठी दिलेल्या क्रेडिट कार्डचा कंपनीच्याच चीफ फायनाशियल अधिकार्याने दुरुपयोग करुन एक कोटी अठरा लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंकज हरिश गुप्ता या 41 वर्षांच्या चीफ फायनाशियल अधिकार्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
परिमल सदानंद देऊसकर हे चेंबूर येथे राहत असून त्यांचे कुटुंबिय पुण्यात राहतात. मारसेलस इन्वेस्टमेंट मॅनेजस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत ते कायदेशीर सल्लागार प्रमुख म्हणून काम करत असून कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील एमआयडीसी परिसरात आहे. या कंपनीत जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आहेत. या कंपनीत अनेक गुंतवणुकदारांनी त्यांची रक्कम गुंतवणुक केली असून ही रक्कम कंपनी दुसर्या कंपनीत गुंतवणुक केली. त्यातून मिळणारे कमिशन कंपनीला मिळते. याच कंपनीत पकंज गुप्ता हा गेल्या तीन वर्षांपासून चीफ फायनाशियल अधिकारी म्हणून कार्यरत होता.
त्याच्यावर कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असल्याने कंपनीने त्याला दोन बँकेचे क्रेडिट कार्ड कार्यालयीन कामासाठी दिले होते. त्याच्याच अकाऊंट टिममध्ये कल्पेश शेठ, तनुश्री सुध्रीक आणि शिल्पा वेंगलट असे तीन कर्मचारी काम करत होते. डिसेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत या तिघांनाही कंपनीच्या अकाऊंटमधून काही आक्षेपार्ह पेमेंट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी पंकज गुप्ताशी चर्चा केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ही माहिती त्यांचे वरिष्ठ सुधांशू नाहटा यांना सांगितली होती. त्यामुळे त्यांनी पंकजकडे संबंधित पेमेंटविषयी खुलासा मागितला होता.
यावेळी त्याने कंपनीच्या क्रेडिट कार्डचा कार्यालयीन कामासाठी वापर न करता वैयक्तिक कामासाठी वापर केल्याची कबुली दिली. डिसेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत त्याने कंपनीच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करुन 1 कोटी 18 लाख 92 हजार 909 रुपयांचा अपहार केला होता. या पेमेंटची त्याने कुठलीही नोंद केली नव्हती. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याकडून संबंधित अधिकार्यांनी एका स्टॅम्प पेपर हा आर्थिक घोटाळा केल्याचा कबुलीनामा लिहून घेतला होता. तसेच त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले होते.
कारवाईला घाबरुन त्याने त्यांच्याच वरिष्ठ अधिकार्यांना त्याच्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर कंपनीच्या मालकांनी परिमल देऊसकर यांना एमआयडीसी पोलिसांत पंकज गुप्ताविरुद्ध तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी पंकजविरुद्ध पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पंकजविरुद्ध कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.