पतीच्या कागदपत्रांसह बोगस स्वाक्षरी करुन गृहकर्ज घेतले
घटस्फोटीत पत्नीसह मित्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पतीच्या कागदपत्रांसह बोगस स्वाक्षरी करुन घटस्फोटीत पत्नीने तिच्याच मित्राच्या मदतीने सुमारे 50 लाखांचे गृहकर्ज घेतल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनन्या आशिष परब ऊर्फ उपासना विजय अधिकारी आणि अभिषेक प्रकाश मिराशी या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अनन्या ऊर्फ उपासना अधिकारी ही तक्रारदाराची घटस्फोटीत पत्नी असून तिने पतीच्या जागी तिचा मित्र अभिषेक मिराशीचा फोटो दिल्याचा आरोप आहे.
आशिष अनंत परब हे कॉटनग्रीन परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते अंधेरीतील सॅनप्रिन टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. 8 फेब्रुवारी 2012 रोजी त्यांनी अनन्याशी विवाह केला होता. लग्नानंतर ते दोघेही सायन येथील प्रतिक्षानगर, दत्तकृपा सोसायटीमध्ये राहत होते. हा फ्लॅट विकत घेताना त्यांनी एका खाजगी बँकेतून 44 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. ते गृहकर्ज या दोघांच्या संयुक्त उत्पन्नातून मंजुर झाले होते. मात्र गृहकर्जाचा हप्ता त्यांच्या बँक खात्यातून जात होता.
डिसेंबर 2019 रोजी आशिष आणि अनन्या यांच्यात कौटुंबिक वाद झाला आणि त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी संमतीने घटस्फोट घेण्यासाठी वांद्रे येथील कौटुंबिक कोर्टात अर्ज केला होता. यावेळी त्यांनी समंतीने कन्सेन्ट टर्म दाखल केली होती. त्यात दत्तकृपा सोसायटीचा फ्लॅट क्रमांक 703 हा अनन्याच्या नावावर हस्तांतरीत करण्यात येईल, त्या फ्लॅटवरील गृहकर्जाचे हप्ते ती 1 नोव्हेबर 2023 पासून फेडेल. त्याच्या नावावरील 50 टक्के हिस्सा ते अनन्या हिच्या नावावर करुन देतील आदीचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला होता.
ठरल्याप्रमाणे मे 2024 रोजी त्यांनी अनन्याच्या नावाने ते फ्लॅट गिफ्ट डिड करुन दिले. आता तीच संबंधित फ्लॅटची शंभर टक्के मालकीण आहे. 1 नोव्हेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीत त्यांनी गृहकर्जाचा हप्ता तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केला होता. काही महिन्यानंतर त्यांनी स्वतच्या कारसाठी एका खाजगी बँकेतून कर्ज काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बँकेने त्यांचा सिबील रिपोर्ट चेक केला असता त्यांच्या नावावर 50 लाखांचे गृहकर्ज असल्याचे दिसून आले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना अन्यया हिने त्यांच्याच सायन येथील फ्लॅटवर 50 लाखांचे गृहकर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित बँकेत जाऊन चौकशी केली असता अनन्याने तिच्यासह त्यांच्या नावाने ते गृहकर्ज घेतल्याचे दिसून आले. सहकर्जदार म्हणून त्यांनी त्यांचे कुठलेही कागदपत्रे बँकेत सादर केली नव्हती किंवा अर्जावर सह्या केल्या नव्हत्या. तरीही बँकेने तिला गृहकर्ज दिले होते. बँकेने दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या बोगस स्वाक्षरी तसेच बोटांचे ठसे होते. त्यात एका व्यक्तीचा फोटो त्यांच्या नावावर देण्यात आला होता.
तो व्यक्ती आशिष परब असल्याचे अनन्याने बँकेला सांगितले होते. चौकशीदरम्यान तो फोटो अनन्याचा मित्र अभिषेक मिराशीचा असून तो लालबाग येथे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी गृहकर्जासाठी अर्ज केले नसताना त्यांची घटस्फोटीत पत्नी अनन्या आणि तिचा मित्र अभिषेक यांनी त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन, त्यांची बोगस स्वाक्षरी आणि बोटांचे ठसे सादर करुन त्यांनीच गृहकर्जासाठी अर्ज केल्याचे भासविले होते. अशा प्रकारे या दोघांनी त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर अनन्या परब ऊर्फ उपासना अधिकारी आणि अभिषेक मिराशी या दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.