मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
मुंबई, – कोकेन तस्करीप्रकरणी घाना देशाचा नागरिक असलेल्या एका कापड व्यापार्याला एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हेनरी अलमोह असे या 34 वर्षीय विदेशी नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 12 लाखांचा 287 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह दोन महागडे मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने मंगळवार 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत विदेशी नागरिकांचा विविध ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अशा विदेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काही विदेशी नागरिक अंधेरीतील मरोळ परिसरात कोकेन ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी, पोलीस निरीक्षक महेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा पाटील, पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप, महेंद्र खांगळ, पोलीस हवालदार मंडले, इटकर, नलावडे, जाधव, पोलीस शिपाई वाघमारे, देसाई, साळुंखे, भोसले, माळी, पवार यांनी मरोळच्या साळवेनगर, विजयनगर ब्रिजजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सोमवारी तिथे हेनरी अलमोह आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 287 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत एक कोटी बारा लाख रुपये इतकी किंमत आहे. या कोकेनसह दोन महागडे मोबाईल असा एक कोटी पंधरा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस तपासात हेनरी हा घाना देशाचा नागरिक असून त्याचे नायजेरीयन नागरिक असल्याचे एक बोगस पासपोर्ट सापडले. तो गेल्या पाच वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होता. सध्या तो अंधेरीतील एका पॉश अपार्टमेंटमध्ये त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता.
तो स्वतला कापड व्यापारी असल्याचे सांगत होता. या व्यवसायाच्या आड त्याने कोकेन विक्री सुरु केली होती. त्याच्या अटकेनंतर त्याची प्रेयसी घरातून पळून गेली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, तो कोकेन कोणाला देण्यासाठी आला होता. त्याने यापूर्वीही कोकेनची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्याच्या प्रेयसीच्या सहभाग होता का याचा पोलीस तपास करत आहेत.