मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन एका 27 वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे तिच्याच सहकारी मित्राने खंडणीची मागणी केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह खंडणीसाठी धम्की दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच नवीनकुमार सिंग या 28 वर्षांच्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्लॅकमेल आणि खंडणीच्या धमकीमुळे तक्रारदार तरुणी ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती, अखेर एमआयडीसी पोलिसांची मदत घेतल्यानंतर आरोपी मित्राविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती.
27 वर्षांची तक्रारदार तरुणी ही घाटकोपर येथे राहते. चार वर्षांपूर्वी ती लोअर परेल येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती. तिथेच तिच्यासोबत नवीन सिंग हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. याच दरम्यान त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. नवीनचा वाढदिवस असल्याने त्याने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला निमंत्रण दिले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी अंधेरीतील मरोळ, न्यू लाईफ हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आली होती. तिथेच वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे त्याने मोबाईलवरुन अश्लील फोटो काढले होते. त्यानंतर ते फोटो दाखवून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. सत्तर हजार रुपये दिले नाहीतर तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. मात्र तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. नविनकुमार सिंगकडून येणार्या ब्लॅकमेल आणि धमकीमुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यात त्याने तिचे अश्लील फोटो तिच्या बहिणीला पाठवून तिची बदनामी केली होती.
या घटनेनंतर तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून नवीन सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा अंधेरीतील मरोळ रोड, न्यू लाईफ हॉटेलमध्ये झाला होता, त्यामुळे त्याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच नवीन सिंग याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये तक्रारदार तरुणीचे काही अश्लील फोटो असल्याचे उघडकीस आले आहे.