जानविधी गोल्ड कंपनीत कर्मचार्यांकडून दागिन्यांची चोरी
चोरीच्या गुन्ह्यांत दोन कर्मचार्यांना अटक व इतरांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 मार्च 2026
मुंबई – अंधेरीतील जानविधी गोल्ड कंपनीत दागिने बनविताना कर्मचार्यांनीच शंभर ग्रॅम वजनाचे सुमारे पावणेसोळा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच या कटातील दोन मुख्य आरोपी सागर तुकाराम धुमाळ आणि अक्षय वसंत लांबे ऊर्फ विशाल या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर सहकार्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याकडून पोलिसांकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. दागिने टॅली होत नसल्याने सीसीटिव्ही लावल्यानंतर चोरीचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आनंद गिरीश सोनी हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहतात. त्यांची जानविधी गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्यालय अंधेरीतील एमआयडीसी, गिरीकुंज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. या कंपनीत त्यांच्यासोबत प्रदीप वरसाले आणि निता जटाकिया हे दोघेही पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीत विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनविले जाते. त्यांची कंपनी वेगवेगळ्या ज्वेलर्स व्यापारी कंपन्याकडून शुद्ध सोने घेते आणि त्यांना सोन्याचे दागिने बनवून देतात. त्यासाठी कंपनीत 40 हून अधिक कर्मचारी कामाला आहे. कंपनीच्या भरणी विभागात दागिने बनविण्यासाठी प्रोसेसिंग केलेले दागिने जाते, या विभागाचा स्टॉक टेली होत नव्हता,
गेल्या काही दिवसांत या विभागातून सोन्याची चोरी होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तिथे सीसीटिव्ही कॅमेरे लावले होते. 11 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीचे त्यांनी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना त्यांचे दोन कर्मचारी सागर धुमाळ आणि विशाल लांबे हे काहीतरी लपवत असल्याचे दिसून आले. या दोघांची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे त्यांनी विशालची चौकशी केली होती. यावेळी त्याने सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी लागणारे सोन्याची तार चोरी केल्याची कबुली दिली. त्याने आतापर्यंत किती सोने चोरी केले आहे, त्याच्यासोबत आणखीन कोण कर्मचारी सहभागी आहे याबाबत विचारणा करण्यात आली होती.
यावेळी त्याने त्याच्यासह सागर आणि इतर कर्मचार्यांनी आतापर्यंत पावणेपंधरा लाख रुपयांचे शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांचे पार्टिकल्स चोरी केल्याची कबुली दिली. हा प्रकार उघडकीस येताच आनंद सोनी यांनी एमआयडीसी पोलिसांत संबंधित कर्मचार्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सागर धुमाळ, विशाल लांबे यांच्यासह इतर अज्ञात कर्मचार्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सागर आणि विशालला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून येणार्या माहितीनंतर इतर कर्मचार्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.