४७ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपीस अटक
पावणेनऊ लाखांचा घरफोडीचा पर्दाफाश; मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – रॉबरीसह घरफोडी, सोनसाखळी चोरी, घातक शस्त्रे बाळगणे आदी ४७ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका मोस्ट वॉण्टेड आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. निसार शौकतअली शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच्या अटकेने तेरा दिवसांपूर्वी अंधेरी येथे झालेल्या एका घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील बहुतांश चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मायकल श्रीनिवास रोकाला हा २१ वर्षांचा तरुण त्याच्या आई आणि बहिणीसोबत अंधेरीतील पंपहाऊसच्या वक्तीबाई चाळीत राहतो. त्याचे वडिल कुवेत येथे नोकरी करत असून ते वर्षांतून एक-दोनदा भारतात येतात. ५ ऑक्टोंबरला रात्री जेवण केल्यानंतर ते सर्वजण पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेले होते. दुसर्या दिवशी शाळेत जायचे असल्याने त्याची बहिण सकाळी लवकर उठली होती. यावेळी तिला तळमजल्यावरील खोलीचा दरवाजा तुटलेला दिसून आले. तिने आत जाऊन पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील विविध दिडशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला होता. या घटनेनंतर मायकल रोकालाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच परिसरातील दिडशे ते दोनशहून अधिक सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह सीसीटिव्ही फुटेजमध्ये निसार शेख याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच दरम्यान निसार शेख हा त्याच्या खार येथील घराजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, पोलीस हवालदार काळे, पुजारी, नलावडे, पोलीस शिपाई शितल माळी, चव्हाण, पवार यांनी खार येथून निसारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सात लाख ऐंशी हजार रुपयांचे १३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
तपासात निसार हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध रॉबरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, घातक शस्त्रे बाळगणे अशा ४७ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात खार पोलीस ठाण्यात सतरा, सांताक्रुज पोलीस ठाण्यात चौदा, विलेपार्ले, मेघवाडी, अंधेरी-एमआयडीसी प्रत्येकी दोन, वांद्रे, वर्सोवा, आंबोली, कांदिवली, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीचा उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.
शेख हा २००७ पासून गुन्हे करत आहेत. तो प्रचंड नशेच्या आहारी गेला आहे. नशेसाठी पैसे मिळावे म्हणून तो रिक्षा चोरतो. बैठ्या चाळीत घरफोड्या करण्यासाठी तो रिक्षा चोरतो. तो जेथून रिक्षा चोरली होती. तेथे पुन्हा पहाटे येऊन ती रिक्षा पार्क करतो. रिक्षा चालकाचा गणवेश घातल्याने पोलीस पकडणार नाही असे त्याला वाटायचे. शेखकडून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासा दरम्यान पोलिसांना एका सीसीटीव्हीत रिक्षा दिसली. त्या फुटेज मध्ये रिक्षाचा शेवटचे दोन अंक दिसले. त्या अंकावरून पोलिसांनी आरटीओच्या मदतीने २ हजार नंबर तपासले. तेव्हा पोलिसांना रिक्षाच्या मालकाची माहिती मिळाली. पोलिसांनी रिक्षा मालकाची चौकशी केली. ती रिक्षा एक जण रात्री भाडे तत्वावर चालवण्यास नेतो. घटनेच्या दिवशी सायंकाळी रिक्षा चालकाने काढली. त्यानंतर त्याने पहाटे रिक्षा पार्क करून तो उत्तर प्रदेशला निघून गेला. त्या रिक्षा चालकाचा नंबर बंद येत असल्याने चालकावर पोलिसांना संशय आला होता.