मुंबई शहरात एमडी ड्रग्ज सप्लाय करणार्‍या त्रिकुटास अटक

36 लाखांचे एमडी, दोन कार व सहा मोबाईल आदी मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – मुंबई शहरात एमडी ड्रग्ज सप्लाय करणार्‍या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यातील एक आरोपी रसायनशास्त्राचा एम. एस्सीचा पदवीधर आहे. फरहान गुलजार खान, प्रतिक सुदर्शन जाधव आणि विजय राजाराम खटके अशी या तिघांची नावे आहेत. या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी 22 लाख 64 हजार रुपयांचा 566 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 12 लाख 60 हजार रुपयांचे दोन कार, 1 लाख 33 हजार रुपयांचे सहा मोबाईल असा 36 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

तीन दिवसांपूर्वी अंधेरी येथे गस्त घालणार्‍या पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खांगळ व अन्य पोलीस पथकाने फरहान खान या 36 वर्षांच्या संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या स्कोडा कारची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 71 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. ड्रग्जसहीत कार ताब्यात घेऊन गुलजारला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते, त्याच्या चौकशीत तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविषयक एकूण तेरा गुन्हे दाखल होते. त्याच्या चौकशीतून पोलिसांनी पालघर येथून प्रतिक जाधव या वाहनचालकास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 215 एमडी ड्रग्जसहीत एक स्विफ्ट डिझायर कार जप्त केली.

या दोघांच्या चौकशीत त्यांना ते ड्रग्ज विक्रीसाठ विजय खटके याने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने पालघरच्या बोईसर परिसरातून विजयला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 280 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. तपासात विजय हा स्वत एमडी ड्रग्ज बनवून त्याची गुलजार आणि प्रतिकच्या मदतीने विक्री करत होता. ही टोळी एमडी ड्रग्ज सप्लाय करणारी एक टोळी असून त्यांनी आतापर्यंत मुंबईसह इतर शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील गुलजार आणि प्रतिक हे दोघेही चालक म्हणून काम करतात तर विजय हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याने रसायनशास्त्रात एम एस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तो बोईसर येथे एमडी ड्रग्ज बनवित होता.

या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्जसहीत उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, दोन कार आणि सहा मोबाईल असा सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महेश गुरव हे करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, पोलीस निरीक्षक महेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खांगळ, आनंद काशिद, महादेव जगताप, पोलीस हवालदार राजू इटकर, टायगर मंडले, गौतम बडे, विशाल पिसाळ, पोलीस शिपाई अभिजीत शहाणे, सदानंद भावसार, संदेश देसाई, निलेश साळुंखे, वाघमारे, लोखंडे, अवघडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page