अनैतिक संंबंधाला विरोध केला म्हणून पित्याची हत्या

आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून शंकर रामचंद्र कांबळे या 58 वर्षांच्या व्यक्तीची तिच्याच मुलीसह प्रियकराने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सोनाली अमोल बाईत आणि महेश पांडे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने रविवार 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सोनाली ही मृत शंकर कांबळे यांची विवाहीत मुलगी असून ती सध्या महेश पांडेसोबत लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, सागबाग, मरोळच्या महेश लंच होम हॉटेलजवळ घडली. राहुल शंकर कांबळे हा घाटकोपरच्या भटवाडी, जगताप चाळीतील रहिवाशी आहे. त्याच्या आईचे निधन झाले असून तो सध्या त्याच्या वडिलांसोबत तिथे राहतो. राहुल अंधेरीतील एका इन्फोटेक कंपनीत तर त्याचे वडिल शंकर कांबळे हे अंधेरीच्या मरोळ नाका परिसरात हाऊसकिपिंगचे काम करत होते. त्याची सोनाली ही बहिण असून तिचे 2008 साली लग्न झाले होते. सध्या ती भटवाडीच्या मुक्ताबाई स्मशानभूमीजवळील परिसरात राहत होती. तिला अनिशा आणि आदित्य नावाचे दोन मुले असून तिचा पती एका खाजगी कंपनीत कामाला होता. सोनालीचे महेश पांडे या व्यक्तीशी प्रेमसंंध होते, ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे ती तिच्या पती आणि दोन्ही मुलांना सोडून निघून गेली होती. या घटनेनंतर त्यांच्याशी राहुल व शंकर कांबळे यांचा काहीही संपर्क नव्हता.

8 जूनला शंकर कांबळे हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होते. यावेळी तिथे सोनाली आणि महेश गेले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून महेशने त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर ते दोघेही निघून गेले होते. हा प्रकार नंतर शंकर कांबळे यांनी राहुलला सांगितला. या दोघांच्या अनैतिक संबंधाला त्यांचा विरोध होता, त्यातून त्यांच्यात वाद झाल्याचे नंतर उघडकीस आले होते. दुसर्‍या दिवशी त्यांनी सोनालीला घरी बोलाविले होते. घरी गेल्यानंतर त्यांचे पुन्हा सोनालीसोबत वाद झाला होता. यावेळी राहुलने सोनालीला महेशने त्यांना का मारहाण केली याचा जाब विचारला होता.

काही वेळानंतर ते दोघेही सोनालीसोबत चिरागनगर पोलीस चौकीजवळ गेले होते. यावेळी महेशने त्यांच्यावर मोबाईल चोरीचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयतन केला. मात्र चौकशीत त्यात काहीच तथ्य आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना योग्य ती समज देऊन सोडून दिले होते. बुधवारी शंकर कांबळे यांना महेश लंच होम येथे शंकर कांबळे यांना सोनाली आणि महेश यांनी बोलावून बेदम मारहाण केली होती.

हा प्रकार समजताच राहुल तिथे गेला होता, यावेळी या दोघांनी त्यालाही मारहाण केली होती. त्यात शंकर कांबळे यांच्या छातीत गंभीर दुखापत झाली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शंकर कांबळे यांना मृत घोषित करण्यात आले. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राहुल कांबळे याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी सोनाली आणि महेश या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page