पार्ले बिस्कीटचा माल वितरण करुन तेरा लाखांचा अपहार
फसवणुकीप्रकरणी खाजगी कंपनीच्या मॅनेजरसह चालकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पार्ले बिस्कीटचा माल वितरण करुन तेरा लाखांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका खाजगी कंपनीच्या मॅनेजरसह चालकाला गुन्हा दाखल होताच काही तासांत एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मंजित स्वामीचरण वर्मा आणि राजकुमार सुरजभान सिंग अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यावसायिक असलेले राहुल जनार्दन सिंग हे अंधेरी परिसरात राहतात. त्यांची श्री साई अरिहंत डिस्ट्रीब्युटर्स नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्यालय अंधेरीतील कोंडीविटा परिसरात आहे. त्यांच्या कंपनीत दहा टेम्पो असून या टेम्पोतून विविध कंपनीच्या मालाची डिलीव्हरी होते. या मालाचे पेमेंट दुसर्या दिवशी कंपनीत जमा करणे, त्यानंतर दुसरा माल घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित कर्मचार्यांवर असते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कंपनीला वांद्रे-दहिसरदरम्यान पार्ले बिस्कीट कंपनीच्या मालाची डिलीव्हरीचे कंत्राट मिळाले होते. या कामासाठी त्यांनी मॅनेजर मंजित वर्मा आणि चालक राजकुमार सिंग यांची नियुक्ती केली होती. ते दोघेही एप्रिल महिन्यांपासून कंपनीतून माल घेऊन संबंधित ठिकाणी वितरण करुन त्यांच्याकडून मालाचे पेमेंट घेत होते.
१५ ऑगस्टला त्यांच्या कंपनीचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात त्यांना वितरण केलेला माल आणि जमा झालेल्या पैशांमध्ये प्रचंड तफावत दिसून आली होती. त्यामुळे त्यांनी कंपनीची मॅनेजर पूजा यादव हिच्याकडे विचारणा केली होती. तिने हिशोबाची पाहणी केली असता तिला लाखो रुपयांचे तफावत असल्याचे दिसून आले होते. या घटनेची राहुल सिंग यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. या चौकशीत १ जुलै ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कंपनीचा मॅनेजर मंजित सिंग व चालक राजकुमार सिंग यांनी वितरणासाठी दिलेल्या मालाचे काही पेमेंट ऑनलाईन जमा केले होते. मात्र सुमारे तेरा लाखांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. ही रक्कम दुसर्या दिवशी कंपनीत जमा करणे बंधनकारक असताना त्यांनी पैसे जमा केल्याचे बोगस स्क्रिनशॉट पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयतन केला होता. त्यामुळे राहुल सिंग यांनी दोन्ही कर्मचार्याकडे विचारणा केली होती. यावेळी या दोघांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता.
मंजित वर्मा आणि राजकुमार सिंग यांनी संगनमत करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच राहुल सिंग यांनी या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच काही तासांत मंजितसिंग आणि राजकुमार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. चौकशीत या दोघांनी सुमारे तेरा लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच फसवणुकीची रक्कम हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.