राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तरुणाला अटक

आरोपीच्या दुकानाच्या तोडफोडप्रकरणी तिघांवर कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 ऑगस्ट 2025
मुंबई, – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी मद्यप्राशन करुन आक्षेपार्ह शिवीगाळ विधान करुन सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी सुजीत जयप्रकाश दुबे या 28 वर्षांच्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. दरम्यान सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीच्या वॉशिंग सेंटरचे तोडफोड केली होती. याप्रकरणी तीन मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होताच अटक केलेल्या चारही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दारुच्या नशेत राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे सुजीत दुबे याला चांगलेच महागात पडले आहे.

अ‍ॅन्थोनी जॉन डिसुझा यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते सध्या अंधेरीतील रामकृष्ण मंदिर मार्ग, कलेक्टर चाळीत राहतात. शनिवारी रात्री उशिरा त्यांना सोशल मिडीयावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ निदर्शनास आला होता. या व्हिडीओमध्ये सुजीत दुबे हा मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करुन विधान करत असल्याचे दिसत होता. अशा प्रकारे आक्षेपार्ह विधान करुन त्याने राज ठाकरे यांची प्रतिमा मलिन करुन सोशल मिडीयावर बदनामीसह समाजात तेढ निर्माण करुन द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.  या व्हिडीओनंतर अ‍ॅन्थोनी डिसुझा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुजीत दुबेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुजीत दुबे याला अटक केली.

तपासात सुजीत हा अंधेरीतील जेव्हीएमआर रोड, दुर्गानगर, एमएमआरडीए कॉलनीतील सिद्धीविनायक सोसायटीत राहत असून त्याचे एक वॉशिंग सेंटर आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मनसे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सुजीत दुबेच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड केली होती. त्यामुळे तेथील वातावरण चांगले तणावाचे झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वॉशिंग सेंटरची तोडफोड करणार्‍या तीन मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत दोन्ही गुन्ह्यांतील चौघांनाही रविवारी दुपारी कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page