फिरण्याचा बहाणा करुन घटस्फोटीत मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच 36 वर्षांच्या मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – मुंबईसह लोणावळा येथे फिरण्याचा बहाणा करुन उत्तरराखंड येथून मुंबईत बोलाविलेल्या घटस्फोटीत मैत्रिणीवर तिच्याच मित्राने अंधेरीतील एका हॉटेलमध्ये लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बंटी वाकुर्डे ऊर्फ अप्पासाहेब ऊर्फ तुकाराम वाकोडे या 36 वर्षांच्या मित्राला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार महिला ही मूळची उत्तराखंडची रहिवाशी आहे. तिचे 2016 रोजी एका व्यक्तीशी लग्न झाले होते, मात्र कौटुंबिक वादानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती पार्लरचे काम करुन तिच्या दोन्ही मुलांसोबत स्वतंत्र राहत होती. जून 2025 रोजी सोशल मिडीयावरुन तिची बंटी वाकुर्डे याच्याशी मैत्री झाली होती. या मैत्रीदरम्यान त्याने तो अखिल भारती भटके विभक्त महासंघाचा अध्यक्ष असल्याचे सांगून तो समाजसेवक आहे. यावेळी त्याने तिला उत्तरप्रदेशच्या बजरंग वाहिनी दलाचा सरचिटणीस पद दिले होते. 16 जुलैला त्याने तिला मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईसह लोणावळा येथे फिरायला जाऊ असे सांगितले होते. त्यामुळे ती 17 जुलैला मुंबईत आली होती. त्यानंतर त्याने तिची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.
शुक्रवारी 18 जुलैला त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथे त्यांनी एकत्र जेवण केले. रुममध्ये असताना त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने त्याला विरोध करत रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र तो रुममधून बाहेर गेला नाही, उलट त्याने तिला धमकी देण्यास सुरुवात केली. तिच्याशी रात्री दोन वेळा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. दुसर्या दिवशी त्याने तिला उत्तराखंडचे तिकिट काढून तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले. घडलेल्या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बंटी वाकुर्डे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बंटी वाकुर्डे ऊर्फ तुकाराम वाकोडे याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.