मद्यप्राशन करुन कार चालविणे मिहीर शहाला महागात पडणार
वाहन परवाना रद्द करण्यासाठी आटीओशी पत्रव्यवहार करणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – मद्यप्राशन करुन भरवेगात कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला वरळी हिट ऍण्ड रन गुन्ह्यांतील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस पालघर आरटीओशी पत्रव्यवहार करणार आहे. त्यामुळे लवकरच त्याचा वाहन परवाना रद्द होणार आहे. मद्यप्राशन करुन कार चालविल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या आता मिहीरचा वाहन परवाना रद्द होणार असल्याने त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
वरळी हिट ऍण्ड रन गुन्ह्यांत मिहीर शहा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून कसून चौकशी सुरु आहे. सुरुवातीला त्याने कारची बाईकला धडक देताना आपण मद्यप्राशन केले नव्हते असा दावा केला होता. आता त्याने मद्यप्राशन करुन कार चालविल्याची कबुली दिली आहे. व्हिस्कीनंतर त्याने बिअर प्यायाल्याची चौकशीत उघडकीस आले आहे. त्याच्यासोबत मद्यप्राशन करणारे त्याचे तीन मित्र, जुहू बारमधील कर्मचारी आणि मालाडमधील बिअर खरेदी करणार्या मालक अशा तेराजणांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यामुळे मिहीर हा अपघाताच्या वेळेस दारुच्या नशेत होता हे सिद्ध झाले आहे. आता त्याचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. लवकरच पोलिसांकडून आरटीओशी पत्रव्यवहार करुन मिहीरचा वाहन परवाना रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. त्याला पालघर आरटीओ कार्यालयातून वाहन परवाना मिळाला होता. मिहीरच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. इतरही कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले. या गुन्ह्यांत मिहीर हा मुख्य आरोपी असल्याने त्याच्याविरुद्ध जास्तीत जास्त भक्कम पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने बोलताना सांगितले.