अल्पवयीन मुलींच्या मदतीने चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दोन महिलांसह तिघांना अटक; दोन अल्पवयीन मुलींची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – अल्पवयीन मुलींच्या मदतीने सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. सबिना आफ्ताब मलिक, आफ्ताब उस्मान मलिक आणि मेहजबी निहाल शेख अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या दोन्ही मुलींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
मुंबई शहरात देह विक्रीसाठी अल्पवयीन मुली पुरविणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती युनिट पाचच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकाने या टोळीची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान या टोळीतील काहीजण अल्पवयीन मुलींसोबत कुर्ला परिसरात येणार असल्याची पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधित दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सुनिता भोर, पोलीस उपनिरीक्षक विजय बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक भुजबळ, विलास देसाई, पोलीस हवालदार सुजीत घाडगे, मिलिंद निरभवणे, तानाजी पाटील, अविनाश चिलप, पोलीस शिपाई युवराज सावंत, महिला पोलीस शिपाई शुभांगी पाटील, पोलीस शिपाई चालक शुभम सावंत यांनी कुर्ला परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ दोन महिलांसह तिघेही दोन अल्पवयीन मुलींना घेऊन आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत ते तिघेही अल्पवयीन मुलींच्या मदतीने शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली. तपासात सबिना आणि आफ्ताब हे ठाण्यातील वाशिंद तर मेहजबी ही गोवंडी परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. तिन्ही आरोपीविरुद्ध भादवीसह पिटा व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या अटकेने धक्कादायक खुलासे होणार आहे. त्यांनी फुस लावून या मुलींना आणून त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे उघडकीस आले.