मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी तिच्याच पित्याने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रार अर्जावरुन दहिसर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून आरोपीने मुलीला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत आरोपी पित्याला अद्याप अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४१ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिली परिसरात राहते. आरोपी तिचा पती तर अकरा वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ते सर्वजण अंधेरी परिसरात राहत होते. याच कालावधीत आरोपीने अनेकदा स्वतच्या मुलीच्या छातीसह शरीराच्या इतर ठिकाणी नकोसा स्पर्श करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तीन वर्षांपासून तिचा लैगिंक अत्याचार केला होता. तिने हा प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तो तिला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. जिवाच्या भीतीसह बदनामीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक नैराश्यात होती. काही महिन्यांपूर्वीच तिची सीडब्ल्यूसीकडे काऊन्सिलिंग करण्यात आली होती. या काऊन्सिलिंगमध्ये बळीत मुलीने तिचे पती तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत असल्याची कबुली दिली होती. त्याचा रिपोर्ट अलीकडेच संबंधितांकडून तिच्या आईला देण्यात आला होता. हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. मुलीच्या चौकशीनंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिने दहिसर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३२३, ३५४ (अ), ५०६ भादवी सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीविरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक शोषण केल्यानंतर पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता त्याच्याविरुद्ध त्याच्याच मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.