मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी शहानुज नावाच्या एका प्रियकराविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या आमिषाने त्याने पिडीत मुलीवर जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. पिडीत मुलगी दहा आठवड्याची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत मुलगी वडाळा येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात राहणारा शहानुज हा तिचा परिचित असून त्यांची चांगली ओळख होती. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध आले होते. काही महिन्यांपूर्वी तो कल्याण येथे राहण्यासाठी गेला होता. तरीही ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. याच दरम्यान त्याने तिच्या राहत्या घरी तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, लग्नानंतर आपण दोघेही सर्वांना सांगू असे तो तिला सांगत होता. एप्रिल महिन्यांत त्याने तिला पळवून नेऊन कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी आणले होते. ८ एप्रिल ते २९ मे २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर त्याच्या राहत्या घरी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. अलीकडेच ही मुलगी तिच्या घरी आली होती. यावेळी तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले असता तिथे डॉक्टरांनी ती दहा आठवडे पाच दिवसांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिला ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पिडीत मुलीने शहानुजविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन), ३६३ भादवी सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून शहानुजचा पोलीस शोध घेत आहेत.