मिरारोड येथील गोळीबाराच्या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
पूर्ववैमस्नातून हत्या करणार्या दोन व्यापार्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
ठाणे, – दोन दिवसांपूर्वी मिरारोड येथे शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनू या व्यक्तीची गोळी झाडून झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना अवघ्या २४ तासांत या कटातील दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली. सैफअली मन्सुरअली खान आणि मोहम्मद युसूफ मन्सुरअली आलम अशी या दोघांची नावे असून ते दोघेही व्यवसायाने व्यापारी आहेत. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी मिरारोड येथील शांती शॉपिंग सेंटरच्या मिरामणी हॉटेलजवळ घडली. याच हॉटेलच्या जिन्याजवळील एका बंद दुकानासमोर शम्स हा त्याचा मित्र उमर रमजान सोलंकी यांच्यासोबत गप्पा मारत होता. यावेळी तिथे आलेल्या अज्ञात व्यक्तीने शम्सच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी इसा इब्राहिम शेख या कापड व्यापार्याच्या तक्रारीवरुन नयानगर पोलिसांनी हत्येसह आर्म्स ऍक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गोळीबारासह हत्येच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने तपासाला सुरुवात केली होती.
तपासात शम्सचे मिरारोडच्या बँक रोडवर राहणार्या मोहम्मद युसूफ आलम याच्याशी पूर्ववैमस्न होते. याच वादातून शम्सची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. गोळीबारानंतर मारेकरी मिरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाट चारवरुन पळून गेले होते. परिसरासह रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच सैफअली खान या २२ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सैफअली हा नालासोपारा येथील आचोळे रोडचा रहिवाशी असून व्यापारी आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील गावठी बनावटीचे एक पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे जप्त केले. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने मोहम्मद युसूफ या अन्य एका व्यापार्याला बदलापूर गावातून शिताफीने ताब्यात घेतले.
मोहम्मद युसूफच्या आदेशावरुन ही हत्या झाल्याचे उघड होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या गोळीबारासह हत्येचा कुठलाही पुरावा नसताना अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करुन गुन्ह्यांतील दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. त्यामुळे वरिष्ठांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, राजू तांबे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, सचिन सावंत, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पोलीस शिपाई सनी सूर्यवंशी, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण असवले, वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजीत गिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार रमेश आलदार, अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रफुल्ल पटेल, रविंद्र पवार, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पोलीस नाईक प्रशांत ठाकूर, पोलीस शिपाई राज गायकवाड, अजीत मैंड, प्रतिक गोडगे, अविनाश चौधरी, रामेश्वर केकान, सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली.