मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 ऑगस्ट 2025
मिरारोड, – मोबाईल चोरीवरुन झालेल्या वादातून यादव ढाब्याचे मालक अजीत राजेंद्रप्रसाद यादव यांची त्यांच्या नऊ मित्रांनी बेदम मारहाण करुन हत्या केली. या हत्येनंतर पळून गेलेल्या नऊ आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून नायगाव पोलिसांनी अटक केली. सुनिल ऊर्फ लल्ला अमर सिंग, शिवम ओमप्रकाश यादव ऊर्फ मोनू, महेश समरजीत यादव, प्रदीप राजेंद्रप्रसाद यादव ऊर्फ भोले यादव, कार्तिकसाई नसीमसाई ऊर्फ कल्लू, राजन शोचमन मौर्या, राजन महेंद्र यादव, सुरज रामकिशन पाल, आरिफ सलीम शेख अशी या नऊजणांची नावे आहेत. सर्व आरोपी उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. हत्येनंतर ते सर्वजण उत्तरप्रदेशातील त्यांच्या गावी पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्यापूर्वीच या सर्वांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील मृत अजीत यादव हे हॉटेल व्यावसायिक होते. त्यांचा नायगाव येथील मालजीपाडा परिसरात यादव नावाचा एक ढाबा आहे. 3 ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजता ते त्यांच्या सहकार्यासोबत काम करत होते. यावेळी अजीत यादव यांचा मित्र लल्ला सिंग, शिवम यदाव, महेश यदव, राजन मौर्या, भोला यादव व इतर दोनजण तिथे आले होते. त्यांच्यात अजीतने मोबाईल चोरीचा आरोप केल्यावरुन प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या कारणावरुन या सर्वांनी अजीत यादव यांना लाकडी दांड्यासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्मचार्यांनी तातडीने जवळच्या तुंगारफाटा येथील कामी विवान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान अजीत यादव यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदाराची पोलिसांनी जबानी नोंदवून संबंधित नऊ आरोपीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले होते. या घटनेची पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी गंभीर दखल घेत नायगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. आरोपींची ओळख पटल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना सर्व आरोपी उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून ते त्यांच्या गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या पथकाने जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातून सुनिल ऊर्फ लल्ला सिंग याच्यासह इतर आठ आरोपींना शिताफीने अटक केली.
चौकशीत त्यांनीच अजीत यादव यांची हत्या केल्याची कबुली दिली. मोबाईल चोरीच्या संशयावरुन त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात त्यांनी अजीतवर प्राणघातक हल्ला करुन त्याची हत्या करुन पलायन केल्याचे सांगितले. या कबुलीनंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक अभिजीत मडके यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, सहाय्यक फौजदार मुनाफ तडवी, पोलीस हवालदार सुनिल पाटील, शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहिते, पोलीस अंमलदार सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, अझरुद्धीन मस्ते, पांडुरंग महाले, बाळासाहेब भालेराव, पोलीस शिपाई अमोल बरडे यांनी केली.