मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – दूध आणण्यासाठी गेलेली सहा वर्षांची मुलगी सोमवारी अचानक मिसिंग झाल्याने माहीम परिसरात एकच खळबळ उडाली होती, मात्र मिसिंग झालेल्या या मुलीला सहा तासांत माहीम पोलिसांच्या विशेष पथकाने धारावी येथून ताब्यात घेतले. तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुलगी सुखरुप सापडल्याने तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान या मुलीचे कोणीही अपहरण केले नव्हते, ती स्वतहून चालत माहीम येथून धारावीला चालत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सितारा मोहम्मद आमीन हाश्मी ही 33 वर्षांची महिला माहीमच्या रहेजा हॉस्पिटलसमोरील नयानगर, चामुंडा मेडीकलजवळ राहते. बळीत ही तिची सहा वर्षांची मुलगी आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता ही मुलगी तिच्या भावासोबत दूध आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र भाऊ घरी आल्यानंतर ती बराच वेळ घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी तिचा शोध सुरु केला होता. मात्र सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती कुठेच सापडली नाही. तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची भीती व्यक्त करुन सितारा हाश्मीने माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माहीम पोलिसांना तिचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक पोपट आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भोकरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पोटे, मच्छिंद्र सानप, अजय चंदनशिव, पोलीस हवालदार पानसकर, पोलीस शिपाई बच्छाव, ताडासम, धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय गुरव, पोलीस हवालदार बनकर, पोलीस शिपाई देवरे, शाहूनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, पोलीस हवालदार ओतारी आदींच्या चार विशेष पथकाने मुलीचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलीस माहीम येथून धारापीपर्यंत पोहचले होते. शेवटी तिला तिथे पाहण्यात आले होते, त्यामुळे या परिसरात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या मुलीला धारावी येथील मेन रोड, धारावी बडी मशिदसमोर पोलीस उपनिरीक्षक उदय गुरव व अन्य पोलीस पथकाने ताब्यात घेतले. मिसिंग तक्रार प्राप्त होताच अवघ्या सहा तासात तिला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मुलीचा शोध घेणार्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.