मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी दोन कंपनीच्या संचालकांना अटक
बोगस करार करुन मनपाची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोन खाजगी कंपनीच्या संचालकांना बुधवारी गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सुनिल श्यामनारायण उपाध्याय आणि महेश मेदाराम पुरोहित अशी या दोघांची नावे आहेत. यातील सुनिल उपाध्याय हा मेसर्च एस. एन बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक तर महेश पुरोहित हा मेसर्च एम. बी ब्रदर्स फर्मचा भागीदार-संचालक आहे. या दोघांनी मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या कामात बोगस करार करुन महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने मंगळवार 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत मध्यस्थी म्हणून महत्त्वाची भूमिका बजाविणार्या केतन अरुण कदम, जय अशोक जोशी आणि कॉन्ट्रक्टर शेरसिंग राठोड या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. याच गुन्ह्यांत सिनेअभिनेता दिनो मोरियासह त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याचा स्वतंत्र तपास ईडीकडून सुरु आहे.
मे महिन्यांत मिठी नदी पूर्नर्जिवितेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस येताच आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींमध्ये मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाचा समावेश होता. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी जागेचे नऊ बोगस करार तयार करण्यात आले होते. यातील बहुतांश करारामध्ये कंत्राटदाराच्या जागेवर दुसर्याच व्यक्तीने स्वाक्षरी होती, काहीवर कंत्राटदारची स्वाक्षरी नव्हती तर काही एमओयूवर तारीख टाकण्यात आली नव्हती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पालिकेच्या तिन्ही अभियतासह मध्यस्थ आणि कंपनीच्या संचालकाच्या घरासह कार्यालयात छापेमारी केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांनी जप्त केले होते. त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आदीचा समावेश आहे. या कारवाईनंतर केतन कदम आणि जय जोशी या दोन मध्यस्थांना तर नंतर कॉन्ट्रक्टर शेरसिंग राठोड अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते. तसेच त्यांच्या इतर सहकार्यांचे नाव समोर आले होते.
त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या सुनिल उपाध्याय आणि महेश पुरोहित या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कंपन्यांना मिठी नदीचे गाळ उपसण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी गाळ टाळण्याच्या जागेच्या मालक-शेतकर्यांच्या नावाने बोगस स्वाक्षरी करुन त्याचे एमओयू करार तयार केला होता. ते करार खरे असल्याचे भासवून महानगरपालिकेत सादर केले होते.
प्रत्यक्षात गाळ उपसा न करता कंत्राट रक्कम म्हणून कोट्यवधी रुपये घेऊन मनपाची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या दोघांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.