मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडी अॅक्शन मोडवर आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी ईडीने एकाच वेळेस मुंबईसह केरळच्या पंधरा ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात सिनेअभिनेता दिनो मोरिया, त्याचा बंधू सॅटिओ मोरियो, महानगरपालिकेतील अधिकारी, कॉन्ट्रक्टर आणि मध्यस्थीच्या घरासह कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेजासह इतर साहित्य जप्त केले आहेत. या दस्तावेजाची शहानिशा सुरु असून संबंधितावर कारवाई होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप झाल्याने ईडी आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. या प्रकरणात ईडीकडून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मे महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती.
याच चौकशीतून या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याची ईडीने गंभीर दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. त्याचाच एक भाग म्हणून ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळमधील कोची शहरात छापे टाकले होते. गाळ काढण्याचे यंत्रसामग्री पुरविणार्या कंपनीपैकी एक मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कोचीची कंपनी आहे. त्यामुळे ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळ शहरात या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेता दिनो मोरिया, काही महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदारासह इतरांच्या घरासह कार्यालयात छापे टाकले होते. जवळपास पंधरा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. मोरिया बंधू वांद्रे येथे राहत असून तिथेही ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली होती असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी निविदा अशा प्रकारे तयार केल्या की, त्याचा फायदा यंत्रसामुग्रीच्या एका विशिष्ठ पुरवठादाराला झाला होता. ही कंत्राटदार कंपनी केरळच्या कोची शहराची असल्याने मुंबईसह केरळ येथे एकाच वेळेस ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच कंपनीने मनपाला बोगस बिल दिल्याचा आरोप आहे. या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या कागदपत्रांची शहानिशा सुरु आहे. याच प्रकरणात संबंधितांवर लवकरच मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.