आमदार कोट्यातील फ्लॅटच्या आमिषाने दोघांची फसवणुक
50 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – आमदार कोट्यातील फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची दोघांची सुमारे 50 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध दादर पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास ुसरु केला आहे. संजय हरिभान सिंह आणि राजेश सुरेश शिंदे अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील संजय सिंहने त्याचाच डॉक्टर असलेल्या व्यावसायिक मित्राची 35 लाखांची तर राजेश शिंदे याने एका स्टेशनरीमध्ये काम करणार्या कर्मचार्याची 15 लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मिरारोडचे रहिवाशी अरविंद रामराज सिंह हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. पूर्वी ते प्रभादेवी परिसरात राहत होते. तिथे त्यांच्या मालकीची नोएमी फार्मास्टिकल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत ते संचालक म्हणून काम करतात. संजय सिंह हा त्यांचा बालपणीचा मित्र असून त्याच्यासोबत त्याचे कौटुंबिक संबंध होते. सिव्हील कॉन्ट्रक्टच्या कामानिमित्त तो नियमित म्हाडा, एसआरए, मनपा, पीडब्ल्यूडी आदी कार्यालयात जात असल्याने त्याची तेथील काही अधिकार्यांशी चांगली ओळख झाली आहे. या ओळखीतून तो त्यांना म्हाडा, म्हाडाचे मंत्री आणि आमदार कोट्यातून त्यांना स्वस्तात घर मिळवून देऊ शकतो. संजय हा त्यांचा बालपणीचा मित्र असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता.
मार्च 2021 रोजी संजय हा त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने पुढील महिन्यांत म्हाडाची फ्लॅटची सोडत निघार असून त्यांची फाईल मंत्रालयातून काढावी लागेल. त्यांच्या फ्लॅटची किंमत पावणेतीन कोटी रुपये असून तो फ्लॅट त्यांना ऐंशी लाखांत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला टप्याटप्याने 35 लाखांचे पेमेंट केले होते. मात्र ही रक्कम दिल्यानंतरही तो त्यांच्याकडे आणखीन दहा लाखांची मागणी करत होता. म्हाडा अधिकार्यांना ही रक्कम द्यावी लागणार असून त्याशिवाय त्यांची फाईल पुढे जाणार नसल्याचे सांगितले. त्याने आधी आमदार कोट्यातून आणि आता म्हाडा कोट्यातून फ्लॅट देतो असे सांगितले होते, त्यामुळे त्यांना त्याच्यावर संशय निर्माण झाला होता.
जोपर्यंत फ्लॅटचे कागदपत्रे मिळत नाहीत तोवर उर्वरित पैसे देणार नाही असे त्यांनी त्याला स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याशी संपर्क साधणे बंद केला होता. वारंवार विचारणा करुनही संजय त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन चौकशी केली असता म्हाडाकडून अशाच प्रकारे कोणालाही कोट्यातून फ्लॅट मिळत नसल्याचे समजले. आमदारसह म्हाडा कोट्यातील फ्लॅटच्या नावाने संजय सिंहने त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांत राजेश शिंदे या आरोपीविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश अंबाजी पटेल हे प्रभादेवी येथे राहत असून एका स्टेशनरी काम करत होते. पाच वर्षांपूर्वीच याच दुकानात त्यांची राजेश शिंदेशी ओळख झाली होती. त्याने तो मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना मंत्रालयात स्टेशनरी पुरविण्याचे काम देतो असे सांगितले. याच दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. याचदरम्यान त्याने त्यांना आमदार कोट्यातून फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
दादर येथे बाजारभावात मिळणारा दोन ते तीन कोटीचा फ्लॅट त्याला एक ते सव्वाकोटीमध्ये देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला होकार दर्शविला होता. फाईल बनविण्यासाठी त्याने त्यांच्याकडून 25 लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला सप्टेंबर 2024 मध्ये पंधरा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने लॉटरी सोडत निघून त्याला लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅट मिळवून दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पंधरा लाख रुपयेही परत केले नाही.
चौकशीदरम्यान राजेश शिंदे हा भामटा असून त्याने अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणुक केल्याची माहिती त्यांना समजली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी राजेश शिंदेविरुद्ध दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचात तपास सुरु असून लवकरच संबंधित आरोपींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.