मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मे २०२४
मुंबई, – अपक्ष आमदार रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटमधून दोन लाखांची कॅश चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमागे त्यांचा नोकर अर्जुन मुखिया याचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन हा बिहारचा रहिवाशी असून तो होळीनिमित्त गावी निघून गेला होता, तो अद्याप परत आला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी खार पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदीप सुभाष ससे हे ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहतात. ते सध्या अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. रवी राणा यांच्या मालकीचे खार येथील चौदावा रस्ता, लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अर्जुन मुखिया हा घरगडी म्हणून काम करत असून तो मूळचा बिहारच्या दरभंगा, अलीनगरचा रहिवाशी आहे. गेल्या दहा महिन्यांपासून तो त्यांच्याकडे कामाला आहे. दिवसभर काम करुन तो रात्री नोकरांसाठी असलेल्या रुममध्ये झोपत होता. रवी राणा यांच्याकडून त्यांना नेहमी घरखर्चासाठी पैसे दिले जातात. फेब्रुवारी महिन्यांनी त्यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. मार्च महिन्यांत अर्जुन हा होळीनिमित्त त्याच्या बिहार येथील गावी निघून गेला होता. मात्र गावी गेल्यानंतर तो पुन्हा मुंबईत परत आला नाही. त्यांनी त्याला बर्याच वेळा कॉल केले, मात्र त्याने कॉलला प्रतिसाद दिला नव्हता.
सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फ्लॅटमध्ये आले होते. त्यांना घरखर्चासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी कपाटातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे दोन लाख रुपये नव्हते. त्यांनी संपूर्ण कपाटाची पाहणी केली, मात्र त्यांना दोन लाख रुपये कुठेच सापडले नाही. त्यामुळे त्यांनी ही माहिती रवी राणा यांना फोनवरुन दिली होती. या फ्लॅटमध्ये त्यांच्याशिवाय अर्जुन हे दोघेही येत होते. अर्जुन गावी निघून गेला आणि परत आला नाही. त्यामुळे त्यांनीच ही चोरी केली असावी असा त्यांचा संशय होता. त्यामुळे त्यांनी अर्जुनला कॉल केला, मात्र त्याने नेहमीप्रमाणे त्यांचा कॉल घेतला नाही. या घटनेनंतर त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी चोरीमागे अर्जुन मुखिया याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विद्यमान आमदाराच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे अर्जुनच्या अटकेसाठी खार पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच त्याच्या बिहार येथे गावी जाणार आहे.