मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 डिसेंबर 2025
मुंबई, – एमएमआरडीच्या फ्लॅटच्या आमिषाने आठजणांची एका महिलेने सुमारे 18 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निता अंकुश सराईकर या 46 वर्षांच्या आरोपी महिलेविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निता ही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी असून तिने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेलेल्या निताच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुनिल सदाशिव अढांगळे हे विक्रोळी परिसरात राहत असून त्यांचा मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय आहे. ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सिद्धार्थ विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सेवा करतात. या कामाच्या माध्यमातून त्यांची निता सराईकर या महिलेशी ओळख झाली होती. तिने तिची एमएमआरडीएमध्ये ओळख आहे. त्यांना कमी किंमतीत फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. ते स्वत नवीन फ्लॅटच्या शोधात होते. त्यात निताने त्यांना स्वस्तात एमएमआरडीएचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी तिला लगेचच होकार दर्शविला होता. मात्र फ्लॅटच्या मोबदल्यात तिने पाच लाखांचे स्वतचे कमिशन सांगितले होते. ही रक्कम दिल्यानंतरच ती त्यांच्यासाठी फ्लॅटसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला पाच लाख देण्याची तयारी दर्शविली होती.
सुनिल अढांगळे हे सामाजिक क्षेत्राशी संबंधित होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचितांना ही माहिती दिली होती. त्यापैकी सातजणांनी फ्लॅट देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांनी निताकडे त्यांच्यासाठीही फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी तिने सर्वांना स्वस्तात फ्लॅट देते असे सांगितले होते. या सर्वांची त्यांनी नितासोबत ओळख करुन दिली होती. यावेळी तिने प्रत्येक फ्लॅटमागे तिचे पाच लाखांचे कमिशनची माहिती दिली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून तिने एमएमआरडीएचे फोटोपास, अलोटमेंट लेटर, आणि काही पावत्या दाखविले होते. ते कागदपत्रे पाहून सर्वांनी कमिशन देण्याचे मान्य केले होते.
ठरल्याप्रमाणे 2 जुलै 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत तिला सुनिल अढांगळे यांनी 3 लाख 80 हजार, आसिफ हुसैन सय्यद यांनी 6 लाख 50 हजार, महादेव मारुती गन्ने यांनी 1 लाख 20 हजार, मनोज रविंद्र मानप यांनी 1 लाख, दयानंद नामदेव माळवे यांनी 1 लाख 50 हजार, संतोष भाऊसाहेब कोलगे यांनी 50 हजार, मंदा बाबू भालेराव यांनी 2 लाख 70 हजार आणि धर्मवीर कुमावत यांनी एक लाख असे 18 लाख 20 हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिने त्यांचे फ्लॅटसाठी अर्ज भरुन घेतले. या अर्जासोबत वैयक्तिक कागदपत्रे, फोटो घेऊन त्यांना तीन ते चार महिन्यांत अलोटमेंट मिळेल असे सातिले. मात्र चार महिने उलटूनही त्याने तिचा शब्द पाळला नाही. विविध कारण सांगून ती त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती.
चौकशीदरम्यान त्यांना निता ही सराईत गुन्हेगार असून तिने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली होती. फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात निता सराईकर हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निता ही पळून गेल्याने तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात निताने अशाच प्रकारे अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तिच्याविरुद्ध विक्रोळीसह इतर काही पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.