चोरीच्या बाईकवरुन मोबाईल चोरी करणार्या दुकलीस अटक
रेकॉर्डवरील दोघांविरुद्ध मोबाईलसह बाईक चोरीचे गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 एपिल 2025
मुंबई, – चोरीच्या बाईकवरुन मोबाईल चोरी करणार्या एका दुकलीस आरे पोलिसांनी अटक केली. मोहसीन लईक अन्सारी ऊर्फ चिकना रायडर आणि मेराज शाहलान शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध बाईकसह मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्याचे रहिवाशी असलेले कृष्णा रामकिशोर यादव हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांच्या कुटुंबियासोबत गोरेगव परिसरात राहतात. त्यांचा पुण्याला दुर्गावती नावाचे एक क्लिनिक आहे. त्यामुळे ते पुण्यात राहत असून त्यांचे वडिल आणि भाऊ गोरेगाव येथे राहतात. अधूनमधून ते पुण्यातून मुंबईत येतात आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 11 जानेवारीला ते पुण्यातून मुंबईत आले, दोन दिवस कुटुंबियांसोबत राहिल्यानंतर ते 13 जानेवारीला पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. पहाटे पाच वाजता गोरेगाव एसटी स्टॅण्डजवळ बसची वाट पाहत असताना अचानक बाईकवरुन दोन तरुण आले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांनी त्यांचा मोबाईल खेचून जोगेश्वरीच्या दिशेने पलायन केले होते. पुण्याला जाणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी या घटनेची पोलिसांत तक्रार केली नव्हती.
14 मार्चला त्यांना भांडुप पोलिसांनी फोन करुन त्यांच्या मोबाईलबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पोलिसांत तक्रार केली नसल्याची कबुली दिली. बाईकसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत भांडुप पोलिसांनी मोहसीन आणि मेराज या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी काही चोरीचे मोबाईल जप्त केले होते. त्यात कृष्णा यादव यांच्या मोबाईलचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी भांडुप पोलिसांच्या सल्ल्याने आरे पोलिसांत मोबाईल चोरीची तक्रार केली होती. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मोहसीन अन्सारी आणि मेराज शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात मोहसीन हा गोवंडी तर मेराज मानखुर्द येथे राहतात. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चोरीच्या बाईकवरुन ते दोघेही रस्त्यावरुन जाणार्या पादचार्यांचे मोबाईल चोरी करतात. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी बाईकसह मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.