होलसेलमध्ये कमी किंमतीत मोबाईल देण्याची बतावणी करुन फसवणुक
दिड कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – होलसेलमध्ये कमी किंमत मोबाईल देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकासह त्याच्या आठ परिचित नातेवाईक आणि मित्रांची सुमारे दिड कोटीचा अपहार करुन फसवणुक करणार्या एका मुख्य वॉण्टेड आरोपीस चौदा महिन्यानंतर मालाड पोलिसांनी अटक केली. सादाब शराफत कुरेशी ऊर्फ रिहान असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दिलेल्या मुदतीत मोबाईल डिलीव्हरी न करता सादाबने त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगून या व्यावसायिकाला जिवे मारण्यासह त्यांच्या मुलाचे अपहरणाची धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
इम्रान अब्रार खान हे मालाडच्या मालवणी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. व्यावसायिक असलेल्या इम्रान यांचा गेल्या २० वर्षांपासून मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे मालाड येथील साईनाथ बीएमसी मार्केटमध्ये एक मोबाईल शॉप आहे. दादर आणि मनिषमार्केटमधून ते मोबाईलच्या होलसेल मालाची ऑर्डर देतात. २०१८ साली त्यांचा नातेवाईक परवेज पारवे याने त्यांची सादाब कुरेशीशी ओळख करुन दिली होती. सादाब हा गोवंडीतील शिवाजीनगर, रायन पार्कमध्ये राहतो. तो कमी किंमतीत अनेकांना होलसेलमध्ये मोबाईल विक्रीचे काम करतो. त्याचे विविध कंपन्यांशी करार असल्याने त्यांना परवेजने सादाबकडून होलसेलमध्ये कमी किंमतीत मोबाईल घेण्याचा सल्ला दिला होता. विश्वास बसावा म्हणून सादाबने त्यांना विविध कंपन्यांचे मोबाईलचे फोटो पाठवून दिले होते. सादाबकडून होलसेलमध्ये मोबाईल खरेदी केल्यास त्यांना मोबाईल विक्रीतून चांगला फायदा होणार होता. त्यामुळे त्याच्याकडून मोबाईल घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सादाबने त्यांना किमान दिड कोटीची गुंतवणुक करण्याचा सल्ला देत मोबाईल कंपनीच्या सीईओला मॅनेज करावे लागेल असे सांगितले होते. याच दरम्यान त्याने त्यांची निलेश मालविया यांची भेट घडवून आणली होती. तो आयफोन कंपनीचा सीईओ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यवर त्यांचा विश्वस बसला होता.
२५ जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि मित्र वसीम अब्रार खान, दिलशाद सलीम, मोहम्मद अझर इमाम, सुजीत सुदेवन आचार्य, नासीर शमशुद्दीन खान, अमीना करिममुल्ला खान, समीर नासीर शेख, इम्तियाज अन्सारी यांनी सुमारे दिड कोटी रुपये जमा करुन सादाबला दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने मोबाईलची डिलीव्हरी केली नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. मुंबई सेंट्रल येथील मोबाईल गोदामाला आग लागली आहे. त्यामुळे डिलीव्हरीसाठी वेळ लागत आहे. मोबाईलची डिलीव्हरी झाली असून टान्सपोर्टमुळे डिलीव्हरीसाठी उशीर होत आहे असे एक ना अनेक कारण सांगून तो त्यांची दिशाभूल करत होता. सादाबकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मोबाईलसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना ५४ लाख रुपयांचे आठ धनादेश दिले होते. मात्र बँकेत धनादेश टाकल्यानंतर त्याने पेमेंट स्टॉप करण्यास सांगितले होते. त्यामुळे ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. दिड वर्षांपूर्वी त्यांनी त्याच्याकडे पुन्हा पैशांबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने पैसे मिळणार नाही. वारंवार पैशांसाठी कॉल केल्यास त्यांना घरात घुसून गोळी घालण्याची तसेच त्यांच्या मुलांचे शाळेतून अपहरण करण्याची धमकी दिली होती. त्याचे अंडररवर्ल्डशी संबंध असून तुला ढगात पाठवायला मला वेळ लागणार नाही अशीही फोनवरुन धमकी दिली होती.
सादाबकडून मिळालेली जिवे मारण्याची धमकी तसेच पैसे मिळविण्याची शक्यता नसल्याने त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सादाब कुरेशीविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सादाब हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या चौदा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सादाबला शुक्रवारी मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. चौकशीत त्याने इम्रानसह इतरांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने फसवणुकीच्या रक्कमेची कशा प्रकारे विल्हेवाट लावली, या पैशांतून त्याने कुठे गुंतवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.