मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ एप्रिल २०२४
मुंबई, – चोरीच्या सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या तीस मोबाईलसह दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. विक्रम विजय भोसले आणि बंटी सुरेंद्र भोसले अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने कांदिवलीतील चार मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितले.
शहरात सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने वरिष्ठांच्या आदेशावरुन स्थानिक पोलिसांनी दिवसा जास्तीत जास्त घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, नारायण खाडे, पोलीस हवालदार जायभाये, जोगलपुरे, नवलू, पोलीस शिपाई प्रविण वैराळ, गवळी, महिला पोलीस शिपाई म्हात्रे, पोलीस शिपाई राणे यांनी दिवसा गस्त घालण्यास सुरुवात केली होती. ही गस्त सुरु असताना कांदिवलीतील महावीरनगर परिसरात या पथकाला दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान ते दोघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात सहाहून अधिक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होती. या सहा गुन्ह्यांसह अन्य गुन्ह्यांतील तीसहून अधिक चोरीचे विविध कंपनीचे मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे. यातील विक्रम अमरावती तर बंटी वर्धाचा रहिवाशी असून सध्या ते दोघेही कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहत होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी व्यक्त केली आहे.