मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मोबाईल चोरीच्या दोन गुन्ह्यांत नऊ आरोपींना बांगुरनगर आणि विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्व आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
घाटकोपर येथे राहणारा रिक्षाचालक मोहम्मद इम्रान खान हा शनिवारी रात्री गोरेगाव येथील शहीद भगतसिंग नगर परिसरात आला होता. यावेळी तिथे असलेल्या चारजणांच्या टोळीने क्षुल्लक कारणावरुन त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी या चोघांनी मोहम्मद इम्रानला बेदम मारहण करुन त्याच्याकडील मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या बांगुरनगर पोलिसांच्या निदर्शनास येताच या पोलीस पथकाने मारहाण करुन मोबाईल चोरी करणार्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच ओम बाबू इंगोले, विलास कैलास पाखरे, प्रथमेश विश्वास क्षेत्रे आणि आशिष विश्वास क्षेत्रे या चौघांना पोलिसांनी अटक केली. ते चौघेही गोरेगाव येथील शहीद भगतसिंग नगर, क्रांती चाळीचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसर्या घटनेत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत पाच आरोपींना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. सुंदर मोसेज पीटर, राजा मोसेज पीटर, नझीर सुलेमान मुल्ला, मोहम्मद अशरफ सुलेमान मुल्ला आणि इरफान इक्बाल शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. दहिसर येथे राहणारा तक्रारदार तरुण हा गोरेगाव परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये चालक म्हणून कामाला आहे. गुरुवारी ५ सप्टेंबरला तो कामानिमित्त विलेपार्ले येथे आला होता. हनुमान रोड, पार्ले टिळक बसस्टॉपजवळ येताच त्याला त्याचा मोबाईल कोणीतरी चोरी केल्याचे समजले. यावेळी त्याने मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या एका तरुणाला पकडून विलेपार्ले पोलिसांच्या स्वाधीन केले. या तरुणाची चौकशी केली असता या गुन्ह्यांत त्याच्या इतर चार सहकार्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर पळून गेलेल्या या चौघांनाही पोलिसांनी विलेपार्ले येथून ताब्यात घेतले. चौकशीत सुंदर आणि राजा हे दोघेही बंधू असून त्यांच्यासह नझीर हे तिघेही गोवंडीतील लल्लूभाई कंपाऊंड, मोहम्मद अशरफ हा पवई तर इरफान हा जुहू गल्लीचा रहिवाशी आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. या पाचजणांच्या अटकेने मोबाईल चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.