मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – मोबाईल चोरीच्या दोन गुन्ह्यांत चौकडीला एमआयडीसी आणि कुर्ला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद फैसल मुन्ना सिद्धीकी, मोहम्मद सैफ हबीबुल्ला सिद्धीकी, सैफअली साबीरअली शेख आणि फिरदोस करीमुल्ला खान अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही कुर्ला आणि अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सैफअली आणि फिरदोस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर गाजेश घोष हा अंधेरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी सकाळी पावणेआठ वाजता तो अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, गुलाटी स्विटसमोरुन जात होता. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्याकडील मोबाईल घेऊन पलायन केले, त्याने त्याचंा पाठलाग केला, मात्र ते दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. ही शोधमोहीम सुरु असताना सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद, पोलीस हवालदार गौतम बडे, पोलीस शिपाई तुषार जाधव, दिनेश लोखंडे, अशोक अवघडे, प्रकाश शिंदे, पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सैफअली शेख आणि फिरदोस खान या दोघांनाही अंधेरी आणि पवई येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात उघडकीस आले.यातील सैफअलीविरुद्ध सहार, अंधेरी आणि मालवणी पोलीस ठाण्यात तीन तर फिरदोसविरुदध पवई, डी. एन नगर, अंधेरी, कल्याण रेल्वे व साकिनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत करुन रॉबरीच्या पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने एमआयडीसी, डी. एन नगर, साकिनाका आणि घाटकोपर येथील चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील मोबाईल, दोन बाईक, एक मंगळसूत्र, एक राणीहार असा ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसर्या कारवाईत कुर्ला पोलिसांनी मोहम्मद फैसल आणि मोहम्मद सैफ या दोघांना अटक केली. मंगळवारी १७ सप्टेंबरला या दोघांनी व्यवसायाने इलेक्ट्रीशियन असलेल्या व्यकंटेश कॅसेमन पडियाळी यांचा मोबाईल चोरी केला होता. व्यकंटेश हे गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी कुर्ला मार्केट, यादवराव मंडई परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी त्याचंा मोबाईल चोरी केला होता. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गोवंडी परिसरातून पोलिसांनी चोरीच्या मोबाईलसह अटक केली. ते दोघेही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी असून त्यांचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.