चोरीच्या 89 मोबाईलसह रेकॉर्डवरील आरोपीस अटक

झोपडपट्टीमधील घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करायचे

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुमारे साडेसात लाख रुपयांच्या चोरीच्या 89 मोबाईलसह एका रेकॉर्डवरील आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अक्षय राजू डुगलज असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या सहकार्‍याच्या मदतीने उत्तर-पश्चिम उपनगरातील विविध झोपडपट्टीमधील घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेने ओशिवरा पोलीस ठाण्यातील 19 मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी मंगेश खिल्लारे हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले.

राहुल रामगोपाल मिश्रा हे जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरात राहतात.28 ऑगस्टला ते ओशिवरा येथील अन्नपूर्णा इमारतीच्या शॉप तीन ते चारमध्ये झोपले होते. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने त्यांचा 50 हजाराचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत ओशिवरासह आसपासच्या परिसरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना देण्यात आले होते.

या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस अज्ञायुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रभात मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपक थोरात, पोलीस हवालदार आनंदा पवार, सिद्धार्थ भंडारे, धनंजय जगदाळे, पोलीस शिपाई विनोद राठोड, विठ्ठल सकट, सोनूसिंह पाटील, अजीत भंगड यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अक्षय डुगलज या तरुणाला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच राहुल मिश्रा यांचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला. त्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दिपक थोरात यांच्यासह इतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याने त्याचा सहकारी मंगेश खिल्लारे याच्या मदतीने मुंबईतील विविध परिसरातून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीची कबुली दिली. त्यानंतर मंगेशचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला होता. अक्षय हा जोगेश्वरीतील आनंदनगर, शिवमंदिरातील अण्णा चाळीत राहत होता.

त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा आकला होता. यावेळी त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चोरीचे सहा मोबाईल जप्त केले. ते मोबाईल त्याने ओशिवरा परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. त्याने इतर चोरीचे मोबाईल वैभव सर्कलपासून सेलिब्रेशन क्लबकडे जाणार ब्रिजखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर तिथे जाऊन पोलिसांनी अन्य 82 चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. अशा प्रकारे त्याच्याकडून पोलिसांनी 89 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

या मोबाईलची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचे बोलले जाते. अक्षयसह मंगेशने ते मोबाईल आनंदनगर, गुलशननगर, गोरेगाव, बांगुरनगर, अंधेरी परिसरातील झोपडपट्टीमधील विविध घरात प्रवेश करुन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्य अटकेने ओशिवरा पोलीस ठाण्यातील एकोणीस मोबाईल चोरीचा पदार्फाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page